ठाकुर्ली स्थानकातील गर्डर टाकण्यासाठी 400 टनांची क्रेन; पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 10:53 AM2019-12-25T10:53:30+5:302019-12-25T10:55:01+5:30
डोंबिवली अपडेट ,कल्याणला जाण्यासाठी प्रवाशांची उडालेली झुंबड आणि भल्या मोठ्या लागलेल्या रांगा पाहता अन्य मार्गावर धावणाऱ्या बस कल्याणकडे वळविण्यात आल्या आहेत.
अनिकेत घमंडी: ठाकुर्ली रेल्वे स्थानकात मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी बुधवारी सकाळी 9.30 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अभियंता नॉर्थ डी डी लोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून ओव्हरहेड वायर, पॉवरचे मुख्य अभियंता रमेश जी, त्यांचे सहायक आणि सहअभियंता आर एन मैत्री या चार अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत 100 कर्मचारी त्या ठिकाणी गर्डर उभे करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी 400 टन वजनाची क्रेन घटनास्थळी आणण्यात आली असून ती पूर्वेला उभी करण्यात आली आहे. त्या लिफ्टिंग क्रेनचे तज्ज्ञ देखील कार्यरत असून त्यांनी सकाळीच कामाला सुरुवात केली आहे.
कोणताही अपघात होऊ नये यासाठी त्या ठिकाणी पॉवरब्लॉक घेण्यात आला असून डोंबिवली कल्याण दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी झालेली होती. काहींनी स्थानक प्रबंधक कार्यलयात याबाबत नियोजनशून्य कारभाराचा संताप व्यक्त केला.
ठाकुर्लीत गर्डर टाकण्यासाठी दुपारचे दोन वाजणार असून त्या आधी काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. वरिष्ठ अभियंता लोलगे यांच्या माहितीनुसार त्या ठिकाणी गर्डर घेऊन रेल्वेची विशेष गाडी आली असून एकेक गार्डर आधी खाली घेण्यात येईल, त्यानंतर तो पुन्हा वर चढवण्यात येईल, यासाठी प्रत्येक प्रक्रियेला साधारण 20 मिनिटांचा कालावधी लागणार असून एक गर्डर बसवण्यासाठी, वेल्डींग, नटबोल्ड, ब्रिक वर्क अशा अन्य तांत्रिक कामासाठी सुमारे दीड तास लागणार आहे, अशा पद्धतीने चार गर्डर चढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
रेल्वेच्या क्रेनने वेळ लागला असता त्यासाठी खासगी लिफ्टिंग क्रेन मागवण्यात आली असून ती कमी वेळेत काम करेल, अधिक जलद काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.