जिल्ह्यातील ४०४ ग्रामपंचायती कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:39 AM2021-09-13T04:39:50+5:302021-09-13T04:39:50+5:30
सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गावखेड्यांमध्ये ४० हजार ९२० रुग्ण सापडले आहे. मात्र, गेल्या २८ दिवसांत ...
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गावखेड्यांमध्ये ४० हजार ९२० रुग्ण सापडले आहे. मात्र, गेल्या २८ दिवसांत जिल्ह्यातील ४०४ ग्रामपंचायतींमध्ये एकही रुग्ण सापडलेला नाही तर सात ग्रामपंचायतींमध्ये आजपर्यंतही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. १५९ ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांत कोरोनाचा एकही मृत्यू नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
जिल्ह्यातील महापालिकांसह नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती मिळून जिल्ह्यात पाच लाख ९९ हजार ५९६ कोरोना रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत तब्बल ११ हजार ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी जिल्ह्यातील गांवखेड्यात एक हजार २१७ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. तर ४० हजार ९२० जणांना आजपर्यंत कोरोना लागण झाली आहे तर आजपर्यंत १५९ ग्रामपंचायतींत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे एका सर्वेक्षणाअंती उघड झाले आहे. एकही मृत्यू नसलेल्या सर्वाधिक ७५ ग्रामपंचायती मुरबाड तालुक्यात आहेत. या खालोखाल शहापूरला ४० ग्रामपंचायती, भिवंडीच्या २५ आणि कल्याण तालुक्यांत दहा ग्रामपंचायतीत एकही रुग्ण दगावलेला नाही. कोरोनाच्या दोन लाटांदरम्यान ६७ ग्रामपंचायतीत पाचपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक ४३ ग्रामपंचायती मुरबाड तालुक्यात आहे तर १४ ग्रामपंचायती शहापूर तालुक्यात आहेत.
जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ४०४ ग्रामपंचायती गेल्या २८ दिवसांपासून कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोनाच्या या दोन्ही जीवघेण्या लाटेत जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सहा आणि शहापूरच्या एका अशा सात ग्रामपंचायतीत एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.
-------