जादा परतावा देण्याच्या नावाखाली १५० गुंतवणूकदारांची ४१ काेटींची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: July 5, 2023 09:15 PM2023-07-05T21:15:22+5:302023-07-05T21:15:31+5:30
मुख्य सूत्रधारास अटक : ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे : हळदीच्या उत्पादनापासून कुरकुमीन या नवीन उत्पादनाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी एक काेटींची गुंतवणूक केल्यास साडेपाच काेटींचा परतावा देण्याच्या आमिषाने सुमारे १५० गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या प्रशांत गोविंदराव झाडे (४७, रा. अंबरनाथ, ठाणे) याला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पाेलिस आयुक्त नीलेश साेनवणे यांनी बुधवारी दिली. त्याला ७ जुलैपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
अंबरनाथच्या ए. एस. अँग्री ॲक्वा एलएलपी या कंपनीचा संचालक प्रशांत झाडे याने आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील रहिवासी रमादेवी चिल्लपारेड्डी (५०) यांच्यासह अनेकांना हळदीच्या नवीन प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखविले हाेते. हा नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी एक काेटींची गुंतवणूक केल्यास १६ महिन्यांनी आधी एक काेटी रुपये दिले जातील. त्यानंतर पुढील पाच वर्षे प्रत्येक १२ महिन्यांनी एक काेटी असा पाच काेटींचा माेबदला देण्याचे आश्वासन दिले.
रमादेवी यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक काेटी रुपये गुंतविण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात प्रकल्प सुरू न करता एक काेटींच्या रकमेचा अपहार करून त्यांची फसवणूक केली. गुंतवणुकीनंतर या प्रकल्पासाठी त्यांची जमीन योग्य नसल्याचे सांगून त्यांना दुसरी जमीन घेण्यासाठी खर्च करण्यास भाग पाडून त्यांचे एक काेटी ७० लाखांचे नुकसान केले. रमादेवी यांनी ४ मार्च २०२३ राेजी ठाण्यातील कासारवडवली पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आतापर्यंतच्या तपासात अशाच प्रकारे सुमारे १५० गुंतवणूकदारांची ४१ काेटी २४ लाख ३० हजार ७८७ रुपयांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीचा ही रक्कम ५०० ते ६०० काेटींच्या घरात जाण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. माेठ्या व्याप्तीमुळे १५ एप्रिल राेजी ठाणे गुन्हे शाखेकडे हे प्रकरण साेपविण्यात आले. यातील संदीप सामंत (५५) आणि संदेश खामकर, (४८) या दाेघांना १६ मार्च राेजी अटक झाली. त्याच्याविरूद्ध १२ मे राेजी ठाणे न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले असून, सध्या ते न्यायालयीन काेठडीमध्ये आहेत.
गुंतवणूकदारांना आवाहन
प्रशांत झाडे हा ‘ए. एस. अँग्री अँण्ड ॲक्वा एल. एल. पी.’ या कंपनीमध्ये ५५ टक्के नफ्याच्या हिश्शामध्ये भागीदार आहेत. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला भाेपाळमधून ३ जुलै राेजी अटक केली. गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीच्या कागदपत्रांसह ठाणे गुन्हे शाखेच्या कायार्लयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.