हनी ट्रॅपमध्ये अडकवून ज्येष्ठ नागरिकाची ४१ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:25+5:302021-07-19T04:25:25+5:30
ठाणे: लॉकडाऊनचा काळात मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे ...
ठाणे: लॉकडाऊनचा काळात मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. सोशल मीडियाद्वारे हनी ट्रॅप लावून ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाकडून ४१ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारची आर्थिक फसवणूक होऊ नये, म्हणून सायबर गुन्हेगारांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांनी शनिवारी केले.
ठाण्यातील कासारवडवली भागातील एक ६३ वर्षीय रहिवासी एका उच्चभ्रू सोसायटीमधील सदनिकेत एकटेच वास्तव्याला आहेत. त्यांचे सोशल मीडियावर अकाउंट असून, त्यांना काही महिन्यांपूर्वी एका मध्यमवयीन महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. त्यांनी ती स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच तिने मेसेंजरच्या माध्यमातून त्यांच्याशी चॅटिंग सुरू केली. तुम्ही एकटे आहात का, तुम्हाला कोणाशी बोलावेसे वाटत असेल, तर मी आपणाशी बोलेन, असे सांगून तिने त्यांना भुरळ घातली. त्यानंतर, ती त्यांच्याशी अगदी रात्रीच्या वेळीही तासभर गप्पा मारू लागली. त्यानंतर, चक्क व्हिडीओ चॅटिंगच्या माध्यमातून आक्षेपार्ह अवस्थेत तिने या ज्येष्ठ नागरिकाबरोबर चॅटिंग सुरू केली. नंतर तिने त्यांनाही तसे करण्यास भाग पाडले. पुढे चॅटिंग करणाऱ्यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओची स्क्रीन रेकॉर्डिंग करून, त्यांनाच तिने तो पाठविला. आता काही लाख रुपये न दिल्यास ही रेकॉर्डिंग सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्याचीही तिने थेट धमकी देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला याची कुठेही वाच्यता नको, म्हणून घाबरून या ज्येष्ठाने तिला काही लाखांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफरही केली. तिने मात्र त्यानंतरही शांत न राहता, त्यांना वारंवार ब्लॅकमेल करीत त्यांच्याकडून ४१ लाखांची रक्कम उकळली. अखेर वारंवार तिच्याकडून होणाऱ्या या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या प्रकरणी या ज्येष्ठांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात ७ जुलै, २०२१ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली. या घटनेत सोशल मीडियावरून ब्लॅकमेल करणाऱ्या कथित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------
ज्येष्ठ नागरिक टार्गेट
सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करून, लाखो रुपये उकळण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. अशाच भामट्यांनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे, असे हनी ट्रॅपचे अनेक प्रकार अलीकडे समोर आले असून, त्याची माहिती परिमंडळ ५ वागळे इस्टेटचे पोलीस उपायुक्त डॉ.राठोड यांनी दिली. ज्येष्ठांनीही कोणत्याही अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, तसेच अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.