लग्नकुंडलीत सर्व्हर डाऊनचे विघ्न, तांत्रिक अडचणींमुळे मंगळवारी तब्बल ४१ विवाहांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:58 AM2017-12-13T02:58:22+5:302017-12-13T02:58:28+5:30
ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊनचा फटका विवाहेच्छुक जोडप्यांना बसला. विवाह बंधनासाठी दोन दिवस या जोडप्यांना खोळंबून रहावे लागले. नोंदणी पद्धतीने विवाह करतानाही मुहूर्त काढण्यात येत असल्याने बहुतांश जोडप्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
ठाणे : ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊनचा फटका विवाहेच्छुक जोडप्यांना बसला. विवाह बंधनासाठी दोन दिवस या जोडप्यांना खोळंबून रहावे लागले. नोंदणी पद्धतीने विवाह करतानाही मुहूर्त काढण्यात येत असल्याने बहुतांश जोडप्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
नव्या आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच काही जोडप्यांच्या लग्नकुंडलीत नोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊन विघ्न आले. जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात २०१६ पासून आॅनलाईन पद्धतीने विवाह नोंदणी आणि त्यापुढील प्रक्रिया करण्यास सुरूवात झाली. सोमवारी विवाह करण्याची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने पार पडत असताना दुपारी १२.३० वाजता सर्व्हर डाऊन झाला आणि एकच गोंधळ उडाला. अनेक जोडप्यांचा हिरमोड झाला. त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक, मित्रपरिवार या साºयांमध्ये घडल्या प्रकाराबाबत आपली नाराजी, संताप व्यक्त केला. ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४’ नुसार विवाहेच्छुक जोडप्यांना ३० दिवस आधी नोंदणी करावी लागते. त्याप्रमाणे जवळपास ३० जोडप्यांनी नोंदणी केली होती. सोमवारी सकाळी ही जोडपी विवाहासाठी आली. दुपारी १२ वाजेपर्यंत १४ जणांच्या विवाहाची नोंदणी सुरळीत पार पडली. १५ व्या जोडप्याच्या विवाह नोंदणीआधी सर्व्हर डाऊन झाला आणि उर्वरित १६ जोडप्यांना घराची वाट धरावी लागली. सर्व्हर सुरू होईल या आशेवर ही १६ जोडपी व त्यांचे नातलग दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यालयात प्रतीक्षा करीत होेते. मात्र तो सुरूच न झाल्याने शेवटी वैतागून ही जोडपी वºहाड्यांसह परत गेली. मंगळवारी नोंदणी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेपूर्वी हजर राहिले. सोमवारी विवाह खोळंबलेल्या १६ जोडप्यांसह मंगळवारी नोंदणी केलेली २५ जोडपी नातेवाईकांसोबत सकाळी ९ पासूनच कार्यालयाबाहेर उभी होती. परंतु दुपारी १ वाजेपर्यंत तिच अडचण कायम होती. दुपारी १ नंतर सर्व्हर सुरू झाला खरा पण तोही धिम्या गतीने. त्यामुळे लग्नाकरिता दोन दिवस ताटकळलेल्या या जोडप्यांची गैरसोय टाळण्यासाठी कार्यालयातील अधिकाºयांनी पारंपारिक पद्धतीने रजिस्टरमध्ये विवाह नोंदणी करण्याचे ठरवले. सोमवारी नोंदणी न झालेल्या १६ जोडप्यांची प्राधान्याने विवाह नोंदणी केली गेली. उर्वरित २५ जोडप्यांसह मंगळवारी सायं. ६ वाजेपर्यंत ४१ जोडप्यांचे विवाह पार पडले, अशी माहिती जिल्हा विवाह अधिकारी संजय शिधये यांनी दिली.
‘त्या’ जोडप्यांची भंबेरी
घरच्यांना अंधारात ठेवून मित्र-मैत्रिणींच्या किंवा लग्नाला अनुकूलता असलेल्या एखाद्या नातलगाच्या उपस्थितीत विवाह करणाºया काही जोडप्यांची या सर्व्हरने विघ्नामुळे अक्षरश: भंबेरी उडवली. अगोदरच घरच्यांना अंधारात ठेवून नोंदणी कार्यालयापर्यंत पोहोचण्यात यश मिळालेल्या या जोडप्यांचा थेट लग्न करुन आशीर्वादाकरिता घरी जाण्याचा मनसुबा होता. मात्र या जोडप्यांना सोमवारी आपला बेत रहित करावा लागला. मंगळवारी पुन्हा घरच्यांची नजर चुकवून नोंदणी कार्यालयात येऊन बार उडवताना त्यांना द्राविडीप्राणायम करावा लागला.
- सकाळी ९ वाजल्यापासून या ठिकाणी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आम्ही हजर राहिलो, सायं. ५ नंतर आमचा विवाह पार पडला, अशी कैफियत एका जोडप्याने ‘लोकमत’कडे मांडली.