भिवंडीत पोलिसांसाठी बांधणार ४१२ घरे
By admin | Published: April 14, 2017 03:18 AM2017-04-14T03:18:49+5:302017-04-14T03:18:49+5:30
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान चांगले राहावे, या उद्देशाने सुसज्ज इमारतींसोबत मोकळी जागा
भिवंडी : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान चांगले राहावे, या उद्देशाने सुसज्ज इमारतींसोबत मोकळी जागा यासाठी सरकारने प्राधान्य दिले आहे. पोलिसांसाठी ४१२ निवासस्थाने बनवण्यास मान्यता दिली असून ती बांधण्यासाठी ८ कोटी ९५ लाख मंजूर केले आहेत. या निवास्थानांमध्ये पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, १८ पोलीस निरीक्षक व ९ सहायक पोलीस निरीक्षक तसेच ३८१ पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.
शहरात सुमारे ८०० पोलीस कर्मचारी काम करत असून भादवड व सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागील इमारतीत ५२० व २०० निवासस्थाने आहेत. परंतु, या ठिकाणी जागा अपुरी असल्याने काही वर्षांपूर्वी भादवड येथे २२० क्षेत्रफळाची ५२० निवासस्थाने बांधलेली आहेत. या निवासस्थानांतर्गत फेरफार करून ४५० क्षेत्रफळाची २६० निवासस्थाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर शहर पोलीस ठाणे, निजामपूर, भोईवाडा, नारपोली व शांतीनगर पोलीस ठाण्यांच्या नव्याने इमारती बांधण्यात येणार असून याचा प्रस्ताव मंजूर असून त्यावर लवकरच कार्यवाही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भिवंडी शहर संवेदनशील असल्याने विविध सण आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी व अधिकारी येत असतात. त्या वेळी त्यांची सोय पोलीस नियंत्रण शेजारी असलेल्या गायकवाड इमारतीमध्ये केली जाते.
या इमारतीत असुविधा आणि अस्वच्छ असल्याने बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करत राहावे लागते. तसेच ही इमारत जुनी झाल्याने महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)