मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : जिल्ह्यातील २० रस्त्यांच्या कामांसाठी ४१.४६ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:13 AM2019-02-06T03:13:50+5:302019-02-06T03:14:15+5:30
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमधील सुमारे ६०.६५ किमीच्या २० रस्त्यांच्या कामांसह दुरुस्तीसाठी व देखभालीच्या कामांसाठी ४१ कोटी ४६ लाख ६० हजार रुपयांच्या पॅकेजला शनिवारी प्रशासकीय मंजुरी दिली.
- सुरेश लोखंडे
ठाणे : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमधील सुमारे ६०.६५ किमीच्या २० रस्त्यांच्या कामांसह दुरुस्तीसाठी व देखभालीच्या कामांसाठी ४१ कोटी ४६ लाख ६० हजार रुपयांच्या पॅकेजला शनिवारी प्रशासकीय मंजुरी दिली. यामुळे जिल्ह्याच्या गावपाड्यांतील रस्त्यांची दयनीय अवस्था आता कायमची संपणार आहे.
जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागांच्या रस्त्यांचे राज्य शासनाच्या या पॅकेजमुळे आता भाग्य उजळले आहे. संबंधित गावकऱ्यांनी आता त्याकडे लक्ष केंद्रित करून दर्जेदार काम करून घेण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाचही तालुक्यांच्या गावखेड्यांमधील ६०.६५ किमी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्यांच्या कामांसाठी ४१ कोटी ४६ लाख ६० हजार रुपयांच्या निधीला राज्यपालांच्या आदेशानुसार प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
२०१९-२० च्या आर्थिक वर्षाच्या बॅच-१ अंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. या निधीपैकी रस्त्यांच्या कामांसाठी ३९ कोटी २१ लाख ८२ हजार रुपये, तर तयार होणाºया या रस्त्यांच्या पाच वर्षे नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी २४ लाख ७८ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मंजुरी मिळालेल्या निधीतून राज्यमार्गांपासून गावांपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील राज्यमार्गापासून ते आंबे या गावाचा व्हीआर असलेल्या रस्त्यासाठी एक कोटी २६ लाख, तर मानकवली, सावरोली, वराडे या रस्त्यासांठी एक कोटी ३९ लाख आणि कडवपाडा रस्त्यासाठी ८१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
भिवंडी, कल्याण तालुक्यांतील रस्ते
तालुक्यामधीलदेखील राज्यमार्गास जोडणाºया व्हीआर रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला. यामध्ये कुडवीचापाडा ते उंबरखंड रस्त्यासाठी तीन कोटी, खालिंग ते लापसाठी दोन कोटी ३८ लाख आणि जिल्हामार्गपासून भुईशेत ते पिंपळशेत या रस्त्यासाठी एक कोटी ३८ लाख मंजूर झाले.
याशिवाय, कल्याण तालुक्यामधीलदेखील हेदुटणे, शिरडोण रस्त्यासाठी एक कोटी ५७ लाख, तर कांबा, पावशेपाडा रस्त्याला ९२ लाख ९८ हजार, नडगाव, बेलपाडा रस्त्याकरिता एक कोटी सात लाख ६१ हजार आणि आंबिवली रस्त्यासाठी ७७ लाख ९३ हजार रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक रस्ते
मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक रस्त्यांचा समावेश आहे. यामध्ये आंबेगाव, घागुर्ले रस्त्याला चार कोटी ५५ लाख, माजगाव-काहेर्ले, सुयोगपाडा रस्त्याला एक कोटी २७ लाख, करवले, असोसे, हिरेघर रस्त्याकरिता दोन कोटी ६० लाख, केदुर्ली, ते म्हाडस रस्त्याला तीन कोटी १० लाख आणि जानपाटलाचापाडा, राव नाव्हे रस्त्याकरिता तीन कोटी २३ लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली. याप्रमाणेच शहापूर तालुक्यामधील वाशाळा, पिंगळवाडी रस्त्याकरिता दोन कोटी ६६ लाख, जरर्डी, तळेखाण रस्त्याला एक कोटी ७७ लाख आणि कसारा, कामडीपाडा रस्त्याच्या कामासाठी ४५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.