आयएमएच्या आंदोलनात ४१५ डॉक्टरांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:53+5:302021-06-19T04:26:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोविडकाळात खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रचंड काम केले. कितीतरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोविडकाळात खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रचंड काम केले. कितीतरी डाॅक्टरांना उपचार करताना कोरोनाची लागण झाली. मात्र, असे असतानाही शुल्लक कारणांनी त्यांना मारहाण, धमक्या, रुग्णालयावर हल्ले असे सत्र सुरू आहेत. त्याबद्दल केंद्र, राज्य सरकार काहीच करत नसल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सदस्य असलेल्या डॉक्टरांनी काळ्या फिती, मास्क वापरून शुक्रवारी काम केले. त्यात डोंबिवलीचे ४१५ डॉक्टर व कर्मचारी सहभागी झाले होते.
डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. भक्ती लोटे ही माहिती दिली. डॉक्टरांवर सतत हल्ले होत असल्याने ते रोखण्यासाठी कठोर कायदा केंद्रीय सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकंटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी. या समाजकंटकांना जामीन मिळू नये, अशी तरतूद या कायद्यात असावी. रुग्णालय आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावेत, अशा मागणी त्यांनी केल्या.
निषेध करत असतानाही रुग्णसेवा कार्य अखंडित राहण्यासाठी डाॅक्टर्स नेटाने आणि जीव तोडून काम करत आहेत. पाच असोसिएशन अनेक वर्षे केंद्राने याबाबतचा कायदा बनवावा, यासाठी पाठपुरावा करत असून, त्याचा मसुदा तयार करून दिला आहे. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत असून, त्याविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. सरकारने यापुढेही दाद न दिल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------