४२ लाख ‘परदेशीबाबू’ यूपीच्या वाटेवर; तिसऱ्या लाटेमुळे अगोदरच धरली वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:25 AM2022-01-21T11:25:28+5:302022-01-21T11:25:42+5:30

महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.

42 lakh people on the way to Uttar pradesh ahead of assembly election | ४२ लाख ‘परदेशीबाबू’ यूपीच्या वाटेवर; तिसऱ्या लाटेमुळे अगोदरच धरली वाट

४२ लाख ‘परदेशीबाबू’ यूपीच्या वाटेवर; तिसऱ्या लाटेमुळे अगोदरच धरली वाट

Next

- संदीप प्रधान
 
ठाणे : मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तब्बल ४२ लाख उत्तर भारतीय उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरिता तिकडे निघाले आहेत किंवा अनेक जण कोरोनाच्या भीतीने अजून तिकडेच आहेत. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका व मुंबई महापालिका निवडणूक साधारणपणे जवळपास येत असल्याने या मतदाराला तिकडे जाण्यापासून रोखण्याकरिता राजकीय पक्षांना धडपड करावी लागते. मात्र यावेळी महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने उत्तर प्रदेशातील जी मंडळी पोटापाण्याकरिता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत वास्तव्य करतात त्यांनी गावाकडची वाट धरली. दुसऱ्या लाटेच्या वेळी उ.प्र.मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी येथील मंडळींनी तिकडे धाव घेऊन मतदान केले होते, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस अरविंद तिवारी यांनी लक्ष वेधले. 

 उत्तर भारतीय महापंचायतचे विनय दुबे म्हणाले की, महाराष्ट्रात ८० लाखांच्या आसपास उत्तर भारतीय असून त्यापैकी ४२ लाख हे तिकडे व येथे मतदार आहेत. कोरोनामुळे त्यापैकी २५ टक्केच परतले. उर्वरित तिकडेच असून यावेळी मतदान करतील. उ.प्र.मधील ४८ टक्के तरुण यावेळी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान करतील व त्यामध्ये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तरुण आहेत.

 मुंबईत पत्रकारिता केलेले व समाजवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार रामकिशोर त्रिवेदी म्हणाले की, मुंबईत येणारे बहुतांश उत्तर भारतीय पूर्वांचलमधून येतात. मागील वेळी त्यांनी भाजपला मते दिली. मात्र, सध्या या भागात मोकाट जनावरांचा प्रश्न तापला असून, त्यामुळे सरकारविरोधी वातावरण आहे.
 पत्रकार व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला म्हणाले की, पूर्वांचलच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे राजकारण जातीपातीभोवती फिरते. 

मात्र यावेळी भाजपने लाभार्थ्यांची नवी जातकुळी निर्माण केली आहे. २४ कोटींच्या उ.प्र.मध्ये १८ कोटी लोक केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे लाभार्थी आहेत. पाच कार्यकर्त्यांचा एक गट याप्रमाणे गट करून वेगवेगळ्या विभागात लाभार्थ्यांच्या याद्या घेऊन हे कार्यकर्ते जातील व लोकांना मतदानाकरिता आवाहन करतील.

भोजपुरी इंडस्ट्री मैदानात 
भोजपुरी स्टार्स निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रवीकिशन, दिनेशलाल यादव तथा निरुव्वा, मनोज तिवारी हे भाजपकरिता प्रचार करणार असून खेसारीलाल यादव हे समाजवादी पार्टीकरिता मैदानात उतरणार आहेत.

Web Title: 42 lakh people on the way to Uttar pradesh ahead of assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.