भिवंडीत ४२ जणांना मोक्का
By admin | Published: April 26, 2017 11:59 PM2017-04-26T23:59:35+5:302017-04-26T23:59:35+5:30
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनपाचा निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याची माहिती आयुक्त योगेश
भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनपाचा निवडणूक विभाग सज्ज झाला असल्याची माहिती आयुक्त योगेश म्हसे व पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडीतील रक्तरंजित राजकीय इतिहास लक्षात घेऊन पोलिसांनी २६ गुंडांना तडीपार केले आहे, तर ४२ व्यक्तींवर मोक्काखाली कारवाई केली आहे. ९०० व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
निवडणुकीत उमेदवारांनी आपले अर्ज आॅनलाइन भरण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मदतनीस उपलब्ध केला जाणार आहे. महानगरपालिकेची हीचौथी निवडणूक आहे. निवडणूक काळात लागणाऱ्या विविध परवानग्यांकरिता मनपाने एक खिडकी योजना योजना सुरू केली असून केवळ ४८ तासांत परवानग्या दिल्या जातील. निवडणूक प्रचारासाठी १४ वर्षांखालील मुलांचा तसेच प्राण्यांचा उपयोग करण्यास बंदी घातली आहे. उमेदवारांचे प्रचार कार्यालय सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन घातले आहे.
शहरातील ६४४ मतदान केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. वृद्ध, अंध, अपंग मतदार व गरोदर महिलांसाठी सोयीसुविधा करण्यात येणार आहेत. मागील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ४९.०६ एवढी होती. त्यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी यावेळी प्रयत्न केले जातील, असे आयुक्त म्हणाले. जास्त मतदान होण्यासाठी ठाणे व उल्हानगर मनपा निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदान करणाऱ्यांना मालमत्ताकरात सवलत देण्याचा निर्णय घेतला, तसाच तो भिवंडीतही घेण्यात येईल, असे म्हसे यांनी स्पष्ट केले. शहरात प्रवेशाच्या पाच ठिकाणी तपासणी केंद्रे स्थापन करून सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. आयकर, विक्रीकर, उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी तैनात असतील, असे त्यांनी सांगितले.
उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, निवडणूक काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे, याकरिता २६ जणांना तडीपार केले आहे. ४२जणांवर मोक्का कायद्याद्वारे कारवाई केली आहे, तर ९००जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. निवडणूक काळात शहरात वाहनांच्या रॅलीस परवानगी देण्यात येणार नाही. वाहनांवर भोंगे लावता येणार नाहीत. (प्रतिनिधी)