स्मार्ट सिटीतील ४२ प्रकल्प संशयाच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:43 AM2020-10-03T00:43:34+5:302020-10-03T00:43:55+5:30
ठाणे स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात ४२ प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, त्यातील अर्बन रेस्टरूम, सुशोभीकरण किरकोळ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
ठाणे : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या ४२ प्रकल्पांतील बहुसंख्य कामे अपूर्ण अवस्थेत असून त्यार खर्च केलेला कोट्यवधींचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. या संशयास्पद कामांची चौकशी करावी, अशी मागणी भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्तांकडे केली आहे.
ठाणे स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरात ४२ प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, त्यातील अर्बन रेस्टरूम, सुशोभीकरण किरकोळ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर, ४६ कोटींचे कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर प्रकल्पाचे काम ९८ टक्के पूर्ण आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा ठाणेकरांना किती फायदा झाला, हे उघड आहे. कोट्यवधींच्या कॅमेऱ्यांचा पोलिसांना उपयोग होत नाही. ११ रेस्ट रूमचे काम पूर्ण झाल्याबद्दल कंपनीचे अधिकारी पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटीला केंद्र सरकारने १९६ कोटी, राज्य सरकारने ९८ कोटी निधी प्रदान केला. तर, आपल्या हिश्श्यातील २०० कोटी रुपये महापालिकेने देऊन कामांना सुरुवात केली. परंतु, प्रत्यक्षात स्मार्ट सिटीतून अपेक्षित सुविधा मिळालेल्या नाहीत. यामुळे अपेक्षित वेग राखू न शकलेले प्रकल्प रद्द करण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक प्रकल्प लादणाºया अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष, महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पत्राद्वारे केली आहे.