जून महिन्यात दहा दिवसात ४३ जणांचा मृत्यु कोरोनाच्या रुग्णांमध्येही होतेय वाढ, १० दिवसात ६६९ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 03:48 PM2020-06-11T15:48:03+5:302020-06-11T15:48:45+5:30
ठाण्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रकारचे उपाय योजले जात आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. मागील १० कोरोनाचे नवीन १५८४ रुग्ण आढळून आले आहेत. यात ४३ जणांचा मृत्यु झाला आहे.
ठाणे : ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांनाच दिसत आहे. १० जून पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४४८५ एवढी असून आतापर्यंत २०१२ रुग्णांना कोरोनावर मात केली आहे. तर १३७ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु मागील १० दिवसात शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून या १० दिवसात १५८४ रुग्ण वाढले असून याच कालावधीत ४३ जणांचा मृत्यु झाला आहे. परंतु दुसरीकडे याच कालावधीत ६६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मागील २१ मार्च पासून देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. त्यानंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण दिसू लागले. परंतु सुरवातीला हा आकडा १ ते १० च्या मध्ये होता. त्यानुसार मे अखेर पर्यंत शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही २९०१ कोरोनाचे रुग्ण होते. तर याच कालावधीत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही १३४३ एवढी होती. मात्र जेव्हा पासून कोरोनाने झोपडपटटी भागात शिरकाव केला, तेव्हा पासून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. लोकमान्य नगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट, कोपरी, नौपाडा, कळवा, माजिवडा मानपाडा, उथळसर, मुंब्रा आदी भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या माध्यमातून झोपडपटटी भागात प्रत्येक घरा घरातून ताप सर्व्हेक्षण मोहीम सुरु केली आहे. त्यात आता पावसाळा सुरु होत असल्याने रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढेल असेही दिसत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरु झाला आहे. त्यामुळे या पाच दिवसांच्या कालावधीतही कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचेच दिसून आले आहे. शहरातील खाजगी कंपन्याही काही अंशी सुरु झाल्या आहेत, तसेच बसेसही, मार्केटही सुरु झाले आहेत. त्यामुळे नागरीकांची मार्केटमध्ये बसमध्ये, कामाच्या ठिकाणी काही अंशी गर्दी वाढू लागली आहे. यामुळे कोरोनाचे संकट आणखी गडद होणार असल्याचे दिसत आहे. जूनचाच विचार केला तर मागील १० दिवसात कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत असल्याचे दिसत आहे. मागील १० दिवसात शहरात १५८४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. रोज शहरात १३० हून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सुदैवाने याच कालावधीत ६६९ कोरोना बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही जरी जमेची बाजू असली तरी या कालावधीत मृत्युचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून आले. मागील १० दिवसात ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे.