४३ हॉटेलचे परवाने निलंबित; एफडीएकडून कोकण विभागातील हॉटेल्सची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:41 AM2019-02-13T02:41:33+5:302019-02-13T02:41:46+5:30
- पंकज रोडेकर ठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने एफडीएच्या कायद्यानुसार नियमांची पूर्तता होते किंवा नाही यासाठी कोकण ...
- पंकज रोडेकर
ठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने एफडीएच्या कायद्यानुसार नियमांची पूर्तता होते किंवा नाही यासाठी कोकण विभागातील टॉप-२० मधील ७९५ हॉटेलची झाडाझडती सुरू आहे. आतापर्यंत ७५९ हॉटेलची तपासणी पूर्ण झाली असून त्यातील ३९१ हॉटेलचालकांना सुधारणा नोटिसा बजावल्या आहेत. तर ४३ हॉटेलचे परवाने निलंबित केले आहेत. तसेच ३२२ हॉटेलची प्रकरणे फेरतापसणीसाठी प्रलंबित असल्याची माहिती एफडीएच्या सूत्रांनी दिली.
ठाणे एफडीएअंतर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात. सद्य:स्थितीत कोकण विभागात एकूण टॉप-२० मधील ७९५ हॉटेल्स आहेत. त्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार, स्वच्छता आणि आरोग्यविषयक विशेष बाबींची पूर्तता होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी एका अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याला २० हॉटेलची जबाबदारी दिली आहे.
एफडीएचे कोकण विभागाचे सह-आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सप्टेंबर २०१८ पासून या तपासणी मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार जानेवारी अखेरपर्यंत जवळपास ७५९ हॉटेलची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ५४२ सर्वाधिक हॉटेल्स ही ठाणे-पालघर जिल्ह्यात आहेत. तर ४० टॉप-२० चे सर्वात कमी हॉटेल्स ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. हॉटेलचालकांना तपासणी दरम्यान कायद्यानुसार पूर्तता नसेल तर त्यांना सुरुवातीला सुधारणा नोटीस बजावली जाते. या १५ दिवसांच्या नोटिसीमध्ये त्याला सुधारणा करण्याची संधी मिळते. त्यानंतर पुन्हा तपासणी केली जाते. पुन्हा होणाºया तपासणीत हॉटेलचालकाने सुधारणा केलेली नसेल तर त्याला दंडाची शिक्षा नसून थेट त्याचा परवाना निलंबित करण्याची तरतूद कायद्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यानुसार, आरोग्य आणि स्वच्छतेच्या विशेष बाबींची तपासणी करताना हॉटेल्सचे किचन, गोडाउन तेथे साठवलेले पदार्थ तसेच पाणी अशा ५७ ते ५८ बाबींची तपासणी प्रामुख्याने केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
३४ हॉटेलची तपासणी बाकी
एका सहायक आयुक्ताला जास्तीत जास्त पाच आणि कमीत कमी दोन अधिकाºयांमार्फत या मोहिमेत हॉटेलची तपासणी केली जात आहे. तसेच एका अधिकाºयाला साधारणत: २० हॉटेल्स दिली आहेत. त्यानुसार ७५९ हॉटेलची तपासणी पूर्ण झाली आहे. तर ३४ हॉटेलची तपासणी बाकी असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
ठाणे-पालघरमध्ये सर्वाधिक परवाने निलंबित
तपासणीत ४३ हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये ३२ हॉटेल्स ही ठाणे-पालघरमधील आहेत. त्यापाठोपाठ ९ रायगड आणि २ हॉटेल्स ही सिंधुदुर्गमधील आहेत. विशेष म्हणेज रत्नागिरीतील निलंबित हॉटेल्सची संख्या शून्य आहे.