रस्त्याच्या रुंदीकरणातील ४३२ झाडांना नवसंजीवनी
By admin | Published: January 18, 2016 03:14 AM2016-01-18T03:14:42+5:302016-01-18T03:14:42+5:30
ठाणे महापालिकेने पोखरण रोड नं. १ च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे, मात्र या रस्त्याच्या आड ४३२ झाडे येत आहेत. या झाडांना
ठाणे : ठाणे महापालिकेने पोखरण रोड नं. १ च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे, मात्र या रस्त्याच्या आड ४३२ झाडे येत आहेत. या झाडांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या झाडांवर कुऱ्हाड चालविण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे.
नरिमान पॉइंट, पुणे-नाशिक हाय वे, मुंबई एअरपोर्टच्या कामामुळे बाधित झालेल्या हजारो झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या क्रिएटिव्ह ग्रुपकडे हे काम सोपविण्यात आले असून या झाडांना नवसंजीवनी देण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
पोखरण येथील हा २४ फूट रुंद असलेला रस्ता ४० फूट रुंद केला जाणार आहे. या मार्गात येणारी बांधकामे पालिकेने कोणत्याही वादंगाशिवाय जमीनदोस्त केली आहेत. रुंदीकरणात ४३२ झाडेसुद्धा बाधित होणार आहेत. रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवून त्या मोबदल्यात अन्यत्र नव्या झाडांची लागवड करण्याची प्रथा पालिकेत आहे. मात्र, आता या रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या झाडांचे अद्ययावत पद्धतीने पुनर्राेपण करण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. पुनर्रोपणाची गेल्या काही वर्षांपासून राबविली जाणारी पद्धत सदोष असल्याने त्यात अपेक्षित यश मिळत नव्हते. मात्र, क्रिएटिव्ह ग्रुपने पुनर्रोपणाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्याचे यश हे ९० टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आल्याची माहिती शहर विकास विभागामधील अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी दिली.
अर्बन लॅण्डस्केप प्लॅनिंग या विषयात पीएच.डी. केलेले डॉ. राजीव चवाथे यांनी झाडांचा तंत्रशुद्ध अभ्यास करून पुनर्रोपणाची पद्धत विकसित केली आहे. या संस्थेने मुंबई एअरपोर्टच्या विस्तारीकरणामुळे बाधित झालेल्या ३५०० झाडांचे स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (साई) प्रांगणात यशस्वी पुनर्रोपण केले आहे. त्याशिवाय, मरिन ड्राइव्हवरील १६३ नारळांच्या झाडांना ओव्हल मैदानात नवसंजीवनी दिली आहे. एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प आणि पुणे-नाशिक हाय वेच्या रुंदीकरणातील वृक्ष पुन्हा जगविण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. तेच तंत्रज्ञान ठाण्याच्या बाबतीतही राबविले जाणार असल्याची माहिती चवाथे यांनी दिली. (प्रतिनिधी)