मालमत्तेच्या व्यवहारात ४३.५० लाखांची फसवणूक
By admin | Published: May 5, 2017 05:38 AM2017-05-05T05:38:09+5:302017-05-05T05:38:09+5:30
फ्लॅटखरेदीच्या व्यवहारात ठाण्यातील एका इस्टेट एजंटची सुमारे ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस
ठाणे : फ्लॅटखरेदीच्या व्यवहारात ठाण्यातील एका इस्टेट एजंटची सुमारे ४३ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कापूरबावडी पोलिसांनी ४ वर्षांनंतर गुन्हा दाखल केला.
कापूरबावडी भागातील रहिवासी अवधेश सिंग यांचा पूर्वी जुन्या वाहनांच्या विक्रीचा व्यवसाय होता. यातूनच त्यांचा पोखरण रोडवरील सुशील टकारिया यांच्याशी परिचय झाला. आपणास फ्लॅट विकत घ्यायचा असल्याचे त्यांनी सुशील टकारिया यांना सांगितले. त्यानुसार, सुशील टकारिया यांनी अवधेश सिंग यांना हॅप्पी व्हॅली येथे राहणारे त्यांचे भाऊ, मे. टकारिया प्रॉपर्टीचे मालक अनिल टकारिया यांच्या भेटीसाठी नेले. अवधेश सिंग यांनी फ्लॅट विकत घेण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली असता, अनिल टकारिया यांनी १०८० चौरस फुटांच्या टू बीएचके फ्लॅटची माहिती दिली. हा फ्लॅट राबोडी भागातील प्रशांत तावडे यांनी सायन येथील उमेश पाटील यांच्या नावे खरेदी केला असून तो विकायचा असल्याचे अनिल टकारिया म्हणाले.
त्या वेळी अनिल टकारियांसह उमेश पाटील, प्रशांत तावडे, सुशील टकारिया, निशांत तावडे आणि सायन येथील दिलेश शिवकर यांच्या उपस्थितीत ६ हजार ५०० रुपये प्रतिचौरस फूट याप्रमाणे फ्लॅटचा सौदा निश्चित करण्यात आला. फ्लॅटची नोंदणी आणि मुद्रांक शुल्काच्या खर्चासह पार्किंगची किंमतही यामध्येच समाविष्ट होती. हा व्यवहार चितळसर येथील मे. अॅसेट कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडचे भूपेंद्र दोशी यांच्याशी होणार असल्याने अवधेश सिंग यांनी डिसेंबर २०११ ते जानेवारी २०१३ या काळात त्यांना धनादेश आणि रोख स्वरूपात ४३ लाख ५० हजार दिले. (प्रतिनिधी)
न्यायालय आदेशाचे पालन
याप्रकरणी आरोपींवर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी अवधेश सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार कापूरबावडी पोलिसांनी भूपेंद्र दोशी, उमेश पाटील, दिलेश शिवकर, सुशील टकारिया, अनिल टकारिया, चंदन वाडेकर, प्रशांत तावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.