दोन जेटींसाठी ४४ कोटींचा निधी
By admin | Published: May 12, 2017 01:38 AM2017-05-12T01:38:34+5:302017-05-12T01:38:34+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात असलेल्या उत्तनमधील भातोडी व पातान बंदरांत
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात असलेल्या उत्तनमधील भातोडी व पातान बंदरांत जेटी बांधण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा,अशी मागणी महापौर गीता जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती मागणी राज्य सरकारने मान्य केली असून या जेटीसाठी प्रत्येकी २४ व २० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.
उत्तन येथील भातोडी व पातान बंदरांजवळ वास्तव्य करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास जाण्यासाठी चौक येथील जेटीचा वापर करावा लागतो. या ठिकाणी सुमारे अडीचशे ते तीनशे मासेमारी बोटी चौक जेटीकडेच येजा करत असतात. परंतु, या जेटीकडे जाण्यासाठी मच्छीमारांना मोठा वळसा घालून जावे लागते. कारण, तेथील समुद्रकिनारी मोठे खडक असल्याने तेथे जेटीची सुविधा नाही. त्यामुळे चौकची जेटीच भातोडी व पातानबंदरांच्या मच्छीमारांना तूर्त सोयीची ठरत आहे. मात्र, स्थानिकांनी ती गैरसोयीचीच ठरत असल्याचा दावा केला आहे.
ही गैरसोय टाळण्यासाठी त्या दोन्ही बंदरांजवळच जेटी बांधून स्थानिक मच्छीमारांची सोय करा, अशी मागणी भातोडी व पातानबंदर परिसरातील मच्छीमारांनी महापौरांकडे केली होती. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आले असता महापौरांनी त्यांच्याकडे जेटीची लेखी मागणी केली होती.
हा विषय मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत येत असल्याने महापौरांनी काही दिवसांपूर्वी मत्स्यविभागमंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. त्यावेळी जानकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जेटीचे अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. जेटीचे अंदाजपत्रक व आराखडा नुकताच सादर करण्यात आल्याने त्याला मान्यता दिल्याचे विभागाने स्पष्ट केले.