दोन चोरट्यांकडून तीन घरफोडीतील ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:15+5:302021-03-04T05:17:15+5:30
भिवंडी : भिवंडी शहरानजिकच्या सरवली व सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील अत्याधुनिक यंत्रमाग कारखाने असून, या ठिकाणी रेकी करून बंद असलेल्या ...
भिवंडी : भिवंडी शहरानजिकच्या सरवली व सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील अत्याधुनिक यंत्रमाग कारखाने असून, या ठिकाणी रेकी करून बंद असलेल्या अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्यात घरफोडी करून तेथील महागडे संगणकीय कार्ड चोरी करणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या कोनगाव पोलिसांनी आवळल्या आहेत. तपासात कोनगाव पोलीस ठाण्यासह भिवंडी तालुका पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या तीन घरफोडी उघडकीस आणून त्यांच्याकडून ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी भिवंडी पोलीस संकुल येथे बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोनगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील सपना इंडस्ट्रियल इस्टेट सरवली येथील कपिल रेयॉन इंडिया या यंत्रमाग कारखान्याचे शटर उचकटून तेथील एअरजेट पिकानॉल सुमम लूम मशीनमधील १८ लाख रुपये किमतीचे ७२ इलेक्ट्रिक कार्ड चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. तर त्यापूर्वी त्याच परिसरात ४ फेब्रुवारी रोजी केजी सिल्क मिल्स टेक्स्टाइल्स कंपनीत घरफोडी करून २४ लाख रुपयांचे १२० इलेक्ट्रिक कार्ड चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल होते. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित पाटील, किरण वाघ, पो उप नि.पराग भाट, पोलीस कर्मचारी वामन सूर्यवंशी,राजेश शिंदे, संतोष मोरे, संतोष पवार, विनायक मासरे, नरेंद्र पाटील, गणेश चोरगे, कृष्णा महाले, अविनाश पाटील, अशोक ढवळे, विजय ताठे यांच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या मदतीने कमलेश माताप्रसाद मिश्रा व जितेंद्र उमा महतो मूळ रा.उत्तरप्रदेश या दोघा संशयितांना दिवा ठाणे येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल दोन्ही गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता, भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील अरटेज फब्स लि. सोनाळे येथील कंपनीतील पाच लाख ३० हजार रुपये किमतीचे ५३ इलेक्ट्रिक कार्ड घरफोडी गुन्ह्याची उकल करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले.
यातील अटक केलेल्या जितेंद्र उमा महतो या आरोपीविरोधात गुजरात राज्यात तीन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे दाखल असून, त्यामध्ये तो फरार आहे. या दोन्ही आरोपींना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत .
===Photopath===
030321\img-20210303-wa0018.jpg
===Caption===
घरफोडीतील दोन चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी केले गजाआड ; ४४ लाखांचा मुद्देमाला जप्त , तीन गुन्ह्यांची झाली उकल