‘उज्ज्वला’ गॅसवरून ४४,१५२ कुटुंबे पुन्हा चुलीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:16+5:302021-03-09T04:44:16+5:30
सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे मिळणारा गॅस मोफत मिळत नाही. सद्य:स्थितील ...
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे मिळणारा गॅस मोफत मिळत नाही. सद्य:स्थितील तब्बल ८१९ रुपयांस गॅस सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे या योजनेच्या जिल्ह्यातील ४४ हजार १५२ महिला लाभार्थी गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत.
जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांतील महिलांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे एलपीजी गॅसचे कनेक्शन मोफत देण्यात आले. त्यासोबत काही रक्कम घेऊन शेगडीही दिली. मात्र, दरमहा गॅस सिलिंडर मोफत देण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे दरमहा वाढणाऱ्या गॅसच्या किमतीला या गरीब कुटुंबीयांना नाहक तोंड द्यावे लागत आहे. रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या या कुटुंबीयांना २३८ रुपये मजुरी मिळत आहे. त्यात घराचा खर्च करीत असतानाच या गॅससाठी ८१९ रुपये भरणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर गेले. सर्वच ठिकाणी जीव घेणारी महागाई आता गरिबांच्या मुळावरच उठली आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या परिवारास सावरण्यासाठी जिल्ह्यातील या ४४ हजार १५२ महिलांनी महागडे गॅस सिलिंडर घेण्याएवेजी पारंपरिक पद्धतीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला आहे.
एक वर्षापूर्वी गॅसच्या वाढीव किमतीवर सर्वांनाच २५ ते ६० रुपयांपर्यंत सबसिडीची रक्कम बँकेत जमा होत असे. परंतु, आता गॅस सबसीडी अनुदान रक्कमही एक वर्षापासून बंद झाली आहे. त्यातच आता सिलिंडरची मनमानी वाढलेली किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे या गरिबांसह सर्वसामान्य परिवाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सबसिडीची रक्कम बंद करण्याची मनमानी सुरू असतानाच या उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शनही सप्टेंबर २०१९ पासून बंद केले आहे. यामुळे सप्टेंबर ते ऑगस्ट २०२० दरम्यान कनेक्शनही देण्यात आले नाही. एकीकडे या योजनेच्या अनुदानाची रक्कम बंद करून योजनाही बंद करीत गॅस सिलिंडरची किंमत मनमानी पद्धतीने वाढविण्यात येत असल्यामुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
...............