बीड आरटीओ घोटाळ्यात परराज्यांतील ४४५ वाहनेही जप्त होणार
By जितेंद्र कालेकर | Published: September 30, 2018 10:43 PM2018-09-30T22:43:14+5:302018-09-30T22:49:46+5:30
भंगारात (स्क्रॅप) काढलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणारे बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे न्यायालयाने पुन्हा ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका नामांकित कंपनीने भंगारात (स्क्रॅप) काढलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणारे बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे न्यायालयाने पुन्हा ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अशा नादुरुस्त वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची भीती असल्यामुळे परराज्यांतील अशी अनेक वाहने ताब्यात घेण्यासाठी ठाणे पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना झाले आहे.
बीडच्या आरटीओ कार्यालयात अशी भंगारातील वाहनांची नोंदणी (पासिंग) करताना अनेक बाबींमध्ये अनियमितता आढळली. शिवाय, २१ आणि २२ क्रमांकांचे फॉर्मही सर्रास बनावट बनवल्याचे उघड झाले. त्यामुळेच स्क्रॅपची वाहने खरेदी करणारा सचिन सोनवणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बीड कार्यालयात नोंदणी करणारा दलाल शाकीर सय्यद यांना २९ आॅगस्ट २०१८ रोजी अटक केली. त्यांच्यापाठोपाठ भगुरे आणि निकम या दोन्ही अधिकाºयांना २५ सप्टेंबर रोजी भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने अटक केली. भिवंडी कनिष्ठ न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी दिली होती. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यामुळे आणखीही वाहनांच्या विक्रीची चौकशी तसेच अशी धोकादायक वाहने जप्त करण्याची कारवाई बाकी असल्यामुळे निकमसह दोन्ही अधिकाºयांची पुन्हा पोलीस कोठडी मिळण्यासाठी भिवंडी गुन्हे शाखेने प्रयत्न केले. त्यामुळे ठाणे सत्र न्यायालयाकडे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ही मागणी न्यायालयाने मान्य करून त्यांना ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. टाटा मोटर्स कंपनीकडून स्क्रॅपसाठी दिलेली ४२८ व्यावसायिक वाहनांची महाराष्टÑात तसेच इतर राज्यांत नोंदणी झाली आहे. त्यापैकी २४ वाहने जप्त झाली. याच कंपनीची ५३ पैकी १० प्रवासी वाहने जप्त केली. महाराष्टÑातील ३६ पैकी ३४ वाहने जप्त झाली असून परराज्यांतील ४४५ वाहने जप्त करण्यात येणार आहेत. गुजरातमध्ये ४२८ पैकी ७२ खासगी वाहने, तर ११ प्रवासी वाहनांचा समावेश आहे. त्यांच्यावरही कारवाईसाठी एक पथक गुजरातला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..............
स्कूलबस धोकादायक
त्रुटी असल्यामुळे परदेशात नाकारल्यानंतर डाव्या स्टेअरिंगची वाहने आरोपींनी उजव्या बाजूची केली. अशा स्कूलबस आणि प्रवासी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचा धोका असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.