शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:48 AM2024-10-23T05:48:39+5:302024-10-23T05:49:33+5:30
या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजपपाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे.
मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही बंधू एकाचवेळी विधानसभेत आपले नशीब आजमावतील. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ही जागा रवी राणा यांच्या पक्षाला हवी होती, मात्र शिंदे सेनेने तिथे अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेला पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना भायखळा इथून तर खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वेतून तिकीट देण्यात आले आहे. या यादीत तीन महिलांचा समावेश आहे.
ठाणे, पालघर, रायगड मिळून पाच उमेदवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी) यांच्यासह गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), संजय राठोड (दिग्रस), अब्दुल सत्तार (सिल्लोड), दादाजी भुसे (मालेगाव बाह्य), तानाजी सावंत (परांडा), शंभूराज देसाई (पाटण), उदय सामंत (रत्नागिरी), दीपक केसरकर (सावंतवाडी) या नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. मुंबईतील सहा आमदारांना पुन्हा संधी दिली. ठाणे, पालघर, रायगडमधून पाच उमेदवार जाहीर करण्यात आले.