स्मशानभूमीसाठी ४५ लाखांची निविदा
By admin | Published: February 14, 2017 02:48 AM2017-02-14T02:48:46+5:302017-02-14T02:48:46+5:30
अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीतील अर्धवट कामे पूर्ण करण्याकरिता ४५ लाखांची नवी निविदा मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी काढली
अंबरनाथ : अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमीतील अर्धवट कामे पूर्ण करण्याकरिता ४५ लाखांची नवी निविदा मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी काढली आहे. लक्षावधी रुपये खर्च करूनदेखील या स्मशानभूमीचे काम अपूर्णावस्थेत राहिल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होते.
या वृत्तानंतर स्मशानभूमी सुधारण्याचे आश्वासन मुख्याधिकारी देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार, आता निविदा काढली आहे. त्यामुळे येत्या काळात या स्मशानभूमीचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’ च्या माध्यमातून हिंदू स्मशानभूमीची दुरवस्था उघड केली. महिनाभरातच प्रशासनाने अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी आणि सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे. १० फेब्रुवारीला या निविदा प्रसिद्ध केल्या असून ७ मार्चला निविदा उघडण्यात येणार आहेत. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर पावसाळ्याआधी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहे. ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाचे काम करून घेण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असलेल्या या कामाला अखेर सुरुवात झाली. काम पूर्ण झाल्यावर इतर स्मशानभूमींची दुरवस्था दूर करण्यावर भर देणार आहे. लहान स्मशानभूमीतही सुविधा पुरवण्यासाठी अहवाल मागवण्यात येणार असून निधीची पूर्तता होताच त्याचे काम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)