तक्रारींसाठीच्या स्टारग्रेड अ‍ॅपचे ४५ लाख खड्ड्यांत

By admin | Published: July 4, 2017 06:46 AM2017-07-04T06:46:32+5:302017-07-04T06:46:32+5:30

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केलेले स्टार ग्रेड अ‍ॅप मागील तीन महिन्यांपासून

In the 4.5 million pieces of the Stargred App for complaints | तक्रारींसाठीच्या स्टारग्रेड अ‍ॅपचे ४५ लाख खड्ड्यांत

तक्रारींसाठीच्या स्टारग्रेड अ‍ॅपचे ४५ लाख खड्ड्यांत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू केलेले स्टार ग्रेड अ‍ॅप मागील तीन महिन्यांपासून बंद असल्याने ते गुंडाळल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठाण्यात कोणत्या भागात किती खड्डे पडले आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याने ठाणेकरांचा प्रवास पुन्हा खडड््यांतून होत आहे. या अ‍ॅपसाठी पालिकेने ४५ लाखांचा खर्चही खड्ड्यांत गेला आहे.
पावसाळ्यात शहरात किती खड्डे पडले, कोणत्या भागात पडले आणि हे खड्डे बुजवण्यासाठी कशा प्रकारच्या हालचाली झाल्या, याबाबत पालिकेने मागील दोन वर्षांपूर्वी स्टार ग्रेड नावाचे अ‍ॅप सुरू केले होते. याचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला होता. हे अ‍ॅप सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यावर खडड््यांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला होता. या तक्रारी कार्यवाहीसाठी तत्काळ संबंधित विभागाकडे दिल्या जात होत्या. तसेच याची कार्यवाही कोणत्या टप्प्यात आहे, याची माहितीदेखील तक्रारदाराला दिली जात होती. त्यानंतर, खड्डा बुजल्यावरदेखील त्याचा फोटो अथवा माहिती म्हणजेच तुमच्या तक्रारीवर काम पूर्ण झाले असा मेसेज पाठवला जात होता. त्यामुळे शहरातील खडड््यांवर पालिकेने या अ‍ॅपच्या माध्यमातून नियंत्रण आणल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, आता पावसाळा सुरू झाला असून शहराच्या विविध भागांत खड्डे पडले आहेत. परंतु, त्यांची तक्रार एकतर फोन करून अथवा प्रभाग समितीत जाऊन सर्वसामान्य ठाणेकरांना द्यावी लागत आहे. काहींनी या अ‍ॅपवर तक्रार करण्याचा प्रयत्नदेखील केला. परंतु, हे अ‍ॅप बंद असल्याची माहिती त्यांच्या निदर्शनास आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागाला छेडले असता ठेकेदाराचा ठेका संपुष्टात आल्याने हे अ‍ॅप बंद असल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु, ते सुरू होणार आहे का, असा सवाल केला असता त्यासाठी सध्या तरी कोणताही ठेकेदार पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच या अ‍ॅपवर केलेला खर्च आता खड्ड्यात गेल्याचे दिसत आहे.

शहरात खड्ड्यांत हरवले रस्ते; वाहतुकीचा वेग मंदावला

ठाणे : शहराच्या विविध भागांत पालिकेने रस्ता रुंदीकरणाची कामे केल्यानंतरही रस्त्यांना खड्डे पडले आहे. प्रशासनाने रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याचा दावा केला होता. परंतु, तो पावसाने या वर्षीदेखील फोल ठरवला आहे. विविध भागांत पडलेल्या खडड््यांमुळे वाहनांना बे्रक लागून वाहतूकही मंदावली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार नसल्याची हमी दिली होती. तसेच पावसाळ्यापूर्वी ज्या रस्त्यांची डागडुजी शिल्लक होती, अशा रस्त्यांवर डांबर टाकण्यात आले आहे.

रुंदीकरणानंतर शहरातील पोखरण-२, ३ आदी रस्त्यांची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत. शहरात विटावा पुलाजवळील वाहतूक येथे सुरू असलेल्या नव्या पुलामुळे मंदावली आहे. त्यातच, या ठिकाणी पडलेल्या खडड््यांमुळे वाहतूककोंडीत आणखीनच भर पडली आहे. तसेच वर्तकनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट, घोडबंदर मार्ग, कोपरी, कॅसल मिल आदींसह शहराच्या इतर छोट्या भागांतही रस्त्यांची जागा खडड््यांनी घेतली आहे.

दरम्यान, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेमार्फत प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत २५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. तसेच भरपावसातही ते बुजवण्यासाठी जेट पॅचर या आधुनिक तंत्रज्ञानाची यंदाही मदत घेण्यात आली आहे.

असे असूनही शहरात खड्डे वाढते आहेत. तीनहातनाका, नितीन कंपनी, माजिवडानाका येथील रस्त्यावरील खडी उडू लागली असून येथेही खड्डे पडू शकतात. पावसाळ्यापूर्वी पालिकेने घोडबंदर भागातील सर्व्हिस रोडसह इतर भागांत डांबराचा मुलामा लावला. परंतु, डांबरही पावसाने वाहून गेले आहे.

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खडड््यांवर पालिकेने मागील काही वर्षांत विविध स्वरूपाचे अत्याधुनिक उपाय केले आहेत. त्यावर, कोट्यवधींची उधळणही केली आहे. परंतु, तरीही हे अत्याधुनिक उपाय कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Web Title: In the 4.5 million pieces of the Stargred App for complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.