४५ हजार गावे अजूनही पुस्तकांपासून दूर
By admin | Published: June 1, 2017 05:03 AM2017-06-01T05:03:42+5:302017-06-01T05:03:42+5:30
ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ग्रंथ सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तितकीच दुर्लक्षलेलीही. १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४५ हजार गावे अजूनही पुस्तक या शब्दापासून कोसो दूर असल्याची खंत ज्येष्ठ अभ्यासक, ग्रंथसखा श्याम जोशी यांनी व्यक्त केली.
व्यास क्रिएशन्स आणि वंदे मातरम् संघ आयोजित पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. या वेळी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले की, ग्रंथदान करणे ही सुसंस्कृत आणि सभ्यपणाची पहिली पायरी आहे. विकासकामे होत राहतात. समाज बदलत राहतो, तरीही मनुष्याचे जगण्याचे नेमके प्रयोजन काय, हे शिकवणारी प्रत्यक्ष कार्यशाळा म्हणजे हा ग्रंथांचा आदानप्रदान महोत्सव. व्यास क्रिएशन्सने आयोजित केलेला हा महोत्सव म्हणजे वाचन संस्कृती वाढवण्याच्या कार्यातील मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी सांगितले. पुस्तक रद्दीमध्ये देणे, हे अमानुषपणाचे लक्षण आहे. आपल्या घरातील ज्येष्ठांनी आपल्या मुलांसाठी आणलेली पुस्तके रद्दीत देणे, हे संवेदनाहीन समाजाचे लक्षण आहे. देशाचे पहिले कर्तव्य म्हणजे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक तयार करणे. हे कार्य केवळ ग्रंथवाचनाने होते. म्हणून, या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. वंदे मातरम् संघाचे अध्यक्ष संदीप लेले म्हणाले की, प्रत्येकाच्या घरामध्ये आर्थिक संपन्नता असतेच. परंतु, प्रत्येक घरामध्ये ग्रंथालय असणे, ही खरी सुबत्ता आहे. घरातील एक खोली संस्कार म्हणून ग्रंथांसाठी ठेवावी. बांधकाम व्यावसायिकांनी अशी खास सोय करावी. या महोत्सवामुळे वाचन संस्कृती वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या महोत्सवात रसिक वाचकांनी देणगी स्वरूपात दिलेली पुस्तके भिलार या पुस्तकांच्या गावाला लोकार्पण करण्यात येतील, असे व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड यांनी सांगितले. या वेळी ग्रंथप्रेमींनी काही पुस्तके प्रातिनिधिक स्वरूपात भिलार या पुस्तकांच्या गावाला देणगी स्वरूपात जोशी यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी समीक्षक श्रीराम बोरकर, नाटककार शशिकांत कोनकर, पत्रकार श्री.वा. नेर्लेकर उपस्थित होते.