४५ वॉर्डन देऊनही कोंडी कायम : उल्हासनगर पालिकेचा पगारावर लाखोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:26 AM2017-09-11T06:26:35+5:302017-09-11T06:26:53+5:30
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना ४५ वॉर्डन दिले. पण, शहरातील कोंडी काही सुटली नाही. उलट, त्यांच्याविरोधात तक्रारी येत होत्या. वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये पालिका खर्च करते. पण, कोंडीची परिस्थिती जैसे थे असल्याने सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी वॉर्डन देण्याचा प्रस्ताव नामंजूर करण्याची विनंती स्थायी समितीला केली. यावर, एकमत होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोंडी सोडवण्याचे काम वाहतूक पोलिसांचे असून त्यात अपयशी झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.
उल्हासनगरमधील नागरिक वाहतूककोंडीने हैराण झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत वाहतूक पोलिसांना सुरुवातीला २५ व नंतर २० असे एकूण ४५ वॉर्डन दिले. तसेच जॅमरसह इतर साहित्य दिले. वाहतूक पोलिसांच्या मदतीला ४५ वॉर्डन दिल्याने वाहतूककोंडी कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, वॉर्डनसह वाहतूक पोलीस शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यात पोलीस अपयशी ठरले. कोंडी सुटण्याऐवजी दंडाच्या पावत्या फाडणे, वसुली करणे आदी प्रकार घडू लागल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेला केल्याचे पुरस्वानी यांनी सांगितले.
महापालिका वॉर्डनच्या पगारावर लाखो रुपये खर्च करते. मात्र, कोंडी जैसे थे असल्याच्या तक्रारीत वाढ झाली. पुरस्वानी यांनी स्थायी समिती सदस्यांसमोर वॉर्डनचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. लाखो रुपये खर्च करूनही वाहतूककोंडी सुटत नाही. मग, वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन कशाला, अशी भूमिका घेतली.
स्थायी समितीच्या सर्वच सदस्यांनी पुरस्वानी यांच्या मताशी संमती दर्शवत वॉर्डनचा विषय सर्वमतांनी नामंजूर केला. कोंडी सोडवण्याचे काम शहर वाहतूक पोलिसांचे आहे. त्यांनी कोंडी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया पुरस्वानी यांच्यासह महापौर मीना आयलानी, प्रकाश माखिजा यांनी दिली आहे. यामुळे कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सर्वाधिक वाहतूककोंडीची ठिकाणे
शहरातील जपानी व गजानन मार्केट रस्ता, शिरू चौक, नेहरू चौक, शिवाजी चौक, १७ सेक्शन, फॉरवर्ड लाइन चौक, कॅम्प नं १ ते ५ परिसरातील मुख्य रस्ते, व्हीनस चौक, पवई चौक, शहाड फाटक रस्ता, उल्हासनगर पोलीस ठाणे रस्ता, मध्यवर्ती रुग्णालयासमोरील रस्ता ही वाहतूककोंडीची नेहमीची ठिकाणे झाली आहेत.
शहरातील वाहतुकीला शिस्त नसल्याने येथील पादचाºयांना ये-जा करताना नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागते. त्यातच आता हे वॉर्डन काढून घेतल्याने कोंडीमध्ये अधिकच भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.