45 वर्षीय मुलानेच केली आईची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 04:47 AM2019-03-31T04:47:33+5:302019-03-31T04:47:58+5:30
भाईंदर पश्चिमेच्या मांडली तलावाजवळील प्रतीक्षा इमारतीत दीड वर्षापासून सोमनाथ मित्रा (४५) व त्याची आई रमा (७०) हे भाड्याने राहतात.
मीरा रोड : भाईंदरमध्ये ४५ वर्षीय मुलानेच शनिवारी सकाळी आईची रागाच्या भरात डोके आपटून हत्या केली. शेजाऱ्यांनी बाहेरून कडी लावत पोलिसांना बोलावल्याने आरोपीला लगेचच अटक केली. तो नोकरी करत नसल्याने आई त्याला बोलत असे. त्यावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची.
भार्इंदर पश्चिमेच्या मांडली तलावाजवळील प्रतीक्षा इमारतीत दीड वर्षापासून सोमनाथ मित्रा (४५) व त्याची आई रमा (७०) हे भाड्याने राहतात. सोमनाथ हा नोकरी करत नव्हता. त्यामुळे आई सतत त्याला नोकरी कर म्हणून सांगत असे. त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. शनिवारी सकाळी दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. संतापलेल्या सोमनाथ याने आईचे डोके आधी भिंतीवर आणि मग जमिनीवर आपटून तिची हत्या केली. रमा यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारचे गोळा झाले. पण, आतून कडी असल्याने रहिवाशांनी अखेर बाहेरून कडी लावली. बाहेर पडता येत नसल्याने सोमनाथ खिडकीतून आरडाओरडा करू लागला. त्याचे हात रक्ताने माखले होते.
काही वेळात भार्इंदर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सोमनाथला अटक केली. आपण बेरोजगार असल्याने आई सतत आपल्याला बोलत असे. त्याला कंटाळून आईची हत्या केल्याचे सोमनाथने कबूल केले, असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. आरोपीची चौकशी केल्यावर नेमकी वस्तुस्थिती समजेल, असे ते म्हणाले.