कोयत्याचे वार करुन पतपेढी एजंटची ४५ हजारांची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 08:43 PM2019-01-22T20:43:31+5:302019-01-22T20:48:14+5:30
ठाण्यातील शिवकृपा या पेतपेढीचा दैनंदिन ठेव प्रतिनिधी सादीक खान याच्यावर कोयत्याचे वार करुन त्याच्याकडील ४५ हजारांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ठाणे: येथील कॅडबरी जंक्शन येथून नितीन कंपनीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर शिवकृपा पतपेढी संस्थेचा एजंट सादीक खान (५१, रा. गौतमनगर, हाजूरी, ठाणे) हे सायकलवरुन जात असतांना त्यांच्यावर तिघा जणांच्या एका टोळक्याने कोयत्याने वार करुन त्यांची ४५ हजारांची रोकड जबरीने हिसकावल्याची घटना २१ जानेवारी रोजी पहाटे पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
खान यांनी २० जानेवारी रोजी खारटन रोड, महागिरी, सिडको, खोपट आदी ठिकाणाहून दुपारी ४.३० वा. पर्यंत शिवकृपा पतपेढीची दैनंदिन ठेव योजनेतील रोकड गोळा केली होती. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ११.३० पर्यंत काही रक्कम त्यांनी गोळा केली. रात्री पावणे बाराच्या सुमारास ते नितीन कंपनीकडे सेवा रस्त्याने जात असतांना हायवे सर्व्हिस सेंटर च्या समोर एका २५ ते ३० वयोगटातील चोरटयांने त्यांच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावली. त्यांनी प्रतिकार करताच त्याच्या दुसºया साथीदाराने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या तिस-या साथीदाराने त्यांचे तोंड दाबले. त्याचवेळी पहिल्याने ही ४५ हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावून तिथून पलायन केले. तर इतर दोघांनी त्यांना जबर मारहाण करुन एका रिक्षातून पलायन केले. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. बी. कवळे हे अधिक तपास करीत आहेत.