अतिवृष्टीग्रस्तांना ४५.५९ कोटींचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:02+5:302021-09-19T04:41:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका ठाणे, पालघरसह संपूर्ण राज्याला बसला होता. यात शेतपिकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका ठाणे, पालघरसह संपूर्ण राज्याला बसला होता. यात शेतपिकांच्या नुकसानीसह घरे, दारे, गुरे, ढोरे यासह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. अखेर दोन महिन्यांनी का होईना महाविकास आघाडी सरकारने या अतिवृष्टींग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा पहिला हप्ता गुरुवारी वितरित केला. यात ठाणे जिल्ह्याला ४२ कोटी ९० लाख ९४ हजार तर पालघर जिल्ह्याला दोन कोटी ६८ लाख ४४ हजार अशी ४५ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपयांची मदत दिली आहे.
अतिवृष्टीनंतर जिल्हा प्रशासनाने त्वरित पंचनामे करून त्याचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांना पाठविला होता. परंतु, दोन महिने झाले तरी शासनाकडून मदत न आल्याने अतिवृष्टीग्रस्त हवालदिल झाले होते. कारण यात अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. परंतु, आता ही मदत आल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत ठाणे जिल्ह्यात दोन हजार ९०८ शेतकऱ्यांच्या ७८२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. याशिवाय १६४ घरांची पडझड झाली. यामध्ये १५१ निवासी घरांचा समावेश आहे. यात पक्क्या घरांसह कच्च्या घरांचा आणि झोपड्यांचा समावेश आहे. तसेच गाई, म्हशींचे १३ गोठे उदध्वस्त झाले आहेत.
१८,५३८ कुटुंबीयांना केले स्थलांतरित
- ठाणे शहर, दिवा, कल्याण-डोंबिवली, मुरबाड, अंबरनाथ-बदलापूर परिसरात सखल भागात साचलेले पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या कालावधीत दोन ते तीन दिवस जिल्ह्यातील ३१ ठिकाणांच्या १८ हजार ५३८ कुटुंबीयांना स्थलांतरित करावे लागले होते.
- जिल्ह्यात सर्वाधिक कल्याण तालुक्यातील सहा ठिकाणी १४ हजार ९८८ कुटुंबीयांची परवड झाली होती. अंबरनाथ तालुक्यातील चार ठिकाणांची तीन हजार ३१ कुटुंबे आणि शहापूर तालुक्यातील २० ठिकाणी ५१८ कुटुंबीयांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. या रहिवाशांच्या घरातील चीजवस्तू, भांडी यांचे मोठे नुकसान झाले होते.
---------------