‘समृद्धी’लगतची ४६ गावे एमएसआरडीसीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 08:43 AM2024-10-02T08:43:30+5:302024-10-02T08:43:37+5:30
ठाण्यातील आमणे परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती
अमर शैला
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समृद्धी महामार्गाला सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमणे भागातील ४६ गावांची ‘आमणे नोड अधिसूचित क्षेत्र’ म्हणून घोषणा केली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास सोमवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गालगतचा भिवंडी परिसरातील सुमारे ११५ चौरस किमी भाग आता एमएसआरडीसीच्या अधिपत्याखाली आहे.
भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस उभे राहिले आहेत. या भागाच्या नियोजनबद्ध आणि संतुलित विकासाची जबाबदारी आता एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे. नगरविकास विभागाने त्याचा शासन निर्णय जारी केला असून, एमएसआरडीसीला भिवंडी तालुक्यातील ३२ गावे आणि कल्याण तालुक्यातील १४ गावे मिळून सुमारे ११ हजार ५०० हेक्टर भागासाठी प्रारूप विकास योजना तयार करून त्याची विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे.
समृद्धी महामार्गासह, प्रस्तावित विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग, दिल्ली मुंबई महामार्ग हे या परिसरातून जातात. तसेच भविष्यात येथून जेएनपीटीसह वाढवणमधील प्रस्तावित बंदराला मालाची वाहतूक होणे अपेक्षित आहे. त्यातून परिसरात लॉजिस्टिक हब आणि वेअर हाऊसचा सुनियोजित विकास होणे आवश्यक आहे. त्यातून एमएसआरडीसीची या भागासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
यापूर्वी भिवंडीतील काही
गावांमध्ये औद्योगिक विकास केंद्र प्रस्तावित होते. त्यामुळे या गावांसाठी एमआयडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती. राज्य सरकारने एमआयडीसीची नेमणूक रद्द करून ही गावे एमएसआरडीसीला दिली आहेत.
कोणत्या
गावांचा समावेश
भिवंडी तालुका : आमणे, आतकोली, अर्जुनाली, बापगाव, भादाने, भवाले, भोईरगाव, बोरीवली तर्फ सोनाळे, चिराडपाडा, देवरुंग, ईताडे, जानवल, खांडवल, किरवली तर्फे सोनाळे, कुकसे, लोनाड, मुथवल, नांदकर, पडघा (सिटी), पिसे, सांगे, सापे, सावड, शिवनगर, तळवली तर्फे सोनाळे, उसरोली, वाहुली, वाशेरे, आन्हे, बोरीवली तर्फे राहूर, कुरुंद आणि वांद्रे
कल्याण तालुका : गुरवली, खडवली, कोंडेरी, नाडगाव, निंबावली, ओझरर्ली, राये, सांगोडे, वासुंद्री, आंबिवली तर्फे वासुंद्री, चिंचवली, मोस, पितांबरेनगर आणि उटणे