छाननीत ४७ उमेदवार ठरले अपात्र
By admin | Published: October 16, 2015 02:03 AM2015-10-16T02:03:21+5:302015-10-16T02:03:21+5:30
बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या छाननी प्रक्रियेत ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ते निवडणूकलढविण्यास अपात्र ठरले आहेत.
कल्याण : बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या छाननी प्रक्रियेत ४७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ते निवडणूकलढविण्यास अपात्र ठरले आहेत. या छाननी प्रक्रियेत शिवसेना-भाजपासह, काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला आहे. आता रिंगणात ९७८ उमेदवार राहिले असून शुक्रवारी कोण माघार घेतो, यावर लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
केडीएमसीच्या निवडणुकीत १०२५ उमेदवारांनी एकूण १११० अर्ज दाखल केले होते. (प्रतिनिधी)
>> रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या छाननी प्रक्रियेत १२ निवडणूक विभागांमध्ये ४७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. बहुतांश अर्ज जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची पोच नसणे, अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, प्रतिज्ञापत्र साक्षांकित न करणे, सूचक आणि अनुमोदक यांची स्वाक्षरी खरी नसणे, याबाबत फेटाळण्यात आले आहेत. १२ निवडणूक विभागांचा आढावा घेता विभाग १ मध्ये ४, २- ४, ३- १, ४- ६, ५- ७, ६- २, ७- ५, ८- १, ९- ७, १०- २, ११- ०, १२- ७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.
प्रभाग क्रमांक ४६ कांचनगावच्या शिवसेनेच्या उमेदवार किरण मोंडकर, भाजपाचे प्रभाग क्रमांक ५६ गावदेवी मंदिरचे उमेदवार जयवंत म्हात्रे यांचे अर्ज बाद ठरले आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम प्रकरणात निलंबित झालेले परंतु प्रभाग क्रमांक ४२ लोकधारामध्ये उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसच्या सचिन पोटे यांचाही अर्ज अवैध ठरविला आहे.