पाच महिन्यांत ४७ बालकांचा मृत्यू, ठाणे रुग्णालयातील घटना, इन्क्युबेटरचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:12 AM2017-09-12T06:12:46+5:302017-09-12T06:12:52+5:30
आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे.
ठाणे : आॅक्सिजनअभावी बळी गेलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फारुखाबाद अन् राज्यातील नाशिकच्या रुग्णालयापाठोपाठ ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू विशेष उपचार कक्षात इन्क्युबेटरची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांत अत्यवस्थ असलेल्या ७३८ नवजात बालकांपैकी ४७ बालकांचा मृत्यू झाल्याचीही गंभीर बाब उघडकीस आली आहे. या काळात ३६ बालकांना मुंबईतील रुग्णालयात पाठवल्याचे उघड झाले.
ठाणे जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या उपचारासाठी नवजात शिशू विशेष उपचार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अत्यवस्थ नवजात अर्भकांवर उपचार करता यावेत, यासाठी वैद्यकीय उपकरणांनी हा विभाग सज्ज ठेवण्यात येतो. जन्मत:च कावीळ असलेली, श्वसनक्रियेस त्रास होत असलेली तसेच वजन कमी असलेली बालके, अपुºया दिवसांच्या बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवणे अपरिहार्य ठरते. येथील एनआयसीयूमध्ये १६ इन्क्युबेटर असून एका इन्क्युबेटरमध्ये एकच बाळ ठेवणे बंधनकारक असते. परंतु, अत्यवस्थ नवजात अर्भकांची संख्या अधिक असल्याने एकेका इन्क्युबेटरमध्ये अनेकदा दोन ते तीन बालकांना ठेवले जात असल्याचे विदारक चित्र आहे.
अर्भकांची प्रतिकारकशक्ती अत्यंत कमी असते. त्यामुळे एकाच पेटीत अनेक बाळांना ठेवले जात असल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.
जिल्हा सामान्य रूग्णालय सार्वजनिक आरोग्य द्वितीय श्रेणीत मोडते. त्यामुळे येथे व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नाही. नवजात शिशू विशेष उपचार कक्षातील गंभीर झालेल्या बालकांना जर व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली, तर त्यांना त्या अवस्तेच मुंबईला पाठवावे लागते. अनेकदा या फरफटीत आधीच प्रकृती नाजूक असलेली ही बालके दगावतात. पण ठाण्यासारख्या स्मार्ट होऊ घातलेल्या शहरात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने या मुलांचा तडफडून होणारा मृत्यू पाहण्याखेरीज पालकांच्या काहीच हाती उरत नाही.
लोकप्रतिनिधी निद्रिस्त असल्याने संताप
ठाणे जिल्ह्यातून तीन खासदार, विधानसभेचे १८ आणि विधान परिषदेचे ६ असे २४ आमदार आहेत. मात्र, हे लोकप्रतिनिधी कुपोषणाने बळी जाणाºया बालकांविषयी जेवढे निद्रिस्त आहेत, तेवढेच सामान्य रुग्णालयात इन्क्युबेटरअभावी मृत्यू झालेल्या ४७ बालकांबाबतीतही असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.