मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत 47 टक्के मतदानाची झाली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 08:21 PM2017-08-20T20:21:12+5:302017-08-21T18:29:47+5:30
राजू काळे
भार्इंदर, दि. 20 - मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत मुसळधार पावसातही अंदाजे ४७ टक्के मतदान केले असले तरी पालिका प्रशासन व राजकाण्यांनी त्यावर असमाधान व्यक्त केले. एकूण ५०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले असले तरी दुस-या दिवशी पालिकेवर कोण कोण निवडून जाणार हे सकाळी १० वाजल्यापासून जाहीर होणार आहे.
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्यावेळी मतदारांनी काही मतदान केंद्रांवर गर्दी करून चांगला प्रतिसाद दिला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील मतदानाचा आकडा ६ टक्क्यांवर स्थिरावला. यानंतर सकाळी ११.३० वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झाल्याचे जाहिर करण्यात आले. गतवेळच्या निवडणुकांत दुस-या टप्यातील मतदान २० ते २५ टक्यांवर गेले असताना ऐन मतदानाच्या दिवशी मुसळधार पावसाने कहर केल्याने यंदाच्या मतदानाचा टक्काही थंडावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाचा आकडा २६ टक्यांवर गेल्यानंतर मतदारांनी भर पावसात मतदान केंद्रांकडे ख-या अर्थाने कूच करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी पावसामुळे मतदानाचा आकडा घसरण्याची धास्ती प्रशासन व राजकारण्यांना लागुन राहिली होती. परंतु, दुपारी ३.३० वाजल्यानंतर मतदानाचा टक्का हळूहळू वाढू लागला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. यानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा टक्का ४७ पर्यंत स्थिरावला. मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला, वेधशाळेकडून शनिवार व रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने चिंता लागली होती. पावसाचा अंदाज हेरुन प्रशासनाने प्रत्येक मतदार केंद्रात मंडप घातले. यामुळे मतदारांना दिलासा मिळाला. मतदान करण्यासाठी येणाय््राा वृद्ध व अपंगांसाठी प्रशासनाने प्रथमच डोली (पालखीची) सोय उपलब्ध करुन दिल्याने त्या मतदारांची चांगली सोय झाली. परंतु, यंदाच्या निवडणुकीत चार जणांच्या पॅनलनुसार केलेल्या प्रभाग रचनांमुळे नेमके मतदान केंद्र शोधताना अडचण निर्माण होत होती. दरम्यान मीरारोड येथील आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन ईलेव्हन शाळेतील मतदान केंद्रात एका अधिकृत मतदाराच्या नावावर तोतया मतदाराने मतदान केले. यामुळे या केंद्रावर बोगस मतदान झाल्याची चर्चा सुरु झाली होती. तत्पुर्वी काँग्रेसचे प्रभारी राजेश शर्मा यांनी याच केंद्रावर बोगस मतदान होणार असल्याची शक्यता वर्तविली होती. ती खरी ठरल्याचा दावा काँग्रेसच्या पदाधिकाय््राांकडुन करण्यात आला. तसेच भार्इंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेतील मतदान केंद्रात आ. नरेंद्र मेहता यांनी आगमन करताच तेथे उपस्थित असलेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे सेना-भाजपा कार्यकर्त्यांत बाचाबाची झाल्याने पोलिसांना त्यांना पांगविण्यासाठी लाठ्या उगाराव्या लागल्या. यंदाची निवडणुक थेट सेना-भाजपात होत असल्याने सेनेचे आ. प्रताप सरनाईक व आ. मेहता मतदानाचा आढावा घेण्यासाठी शहरभर फिरताना दिसत होते. मतदानाला सुरुवात होताच शहरातील नेत्यांनी आपापल्या मतदान केंद्रांत मतदानाचा हक्क बजाविला. मतदानाच्या पुर्व संध्येला एका महिलेकडे ४० लाखांची रोकड सापडल्यासह प्रभाग २ मधील भाजपाच्या उमेदवार शानू गोहिल यांनी प्रभागात पैसे वाटल्याच्या तसेच भार्इंदर पश्चिमेकडील बालाजीनगरमध्ये कल्याणचे भाजपा आ. नरेंद्र पवार फिरत असल्याच्या अफवेचे शहरात पीक आले होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत कोणतीही नोंद नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे निवडणुक व पोलिस प्रशासनाकडुन सांगण्यात आले.
माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित : मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने वेधशाळेची संवाद साधणे आवश्यक होते. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊनच आयोगाने मतदानावर विपरीत परिणाम होण्याच्या शक्यतेनुसार निवडणुकीची तारीख निश्चित करणे आवश्यक होते. यंदाच्या निवडणुकीत एकुण १७ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली होती. त्यांपैकी केवळ प्रभाग १७ मधील एकाच तृतीपयंथी मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान थेट केंद्रात तसेच १०० मीटर प्रतिबंधित परिघात उमेदवारांचा सर्रास वावर होता. त्यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काढण्यासाठी निवडणुक व पोलिस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. प्रत्येक केंद्रात मतदारांना उमेदवारांची माहिती मिळावी, यासाठी प्रशासनाने उमेदवारांच्या तपशीललांचे फलक दर्शनी भागात लावले होते.