४८ जणांचे जामीन अर्ज फेटाळले, पेट्रोलपंप घोटाळा प्रकरण, लवकरच अटकसत्र सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:59 AM2017-11-04T02:59:30+5:302017-11-04T02:59:41+5:30
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या १२ आणि पोलिसांच्या ‘रडार’वर असलेल्या (पाहिजे) ३६ अशा एकूण ४८ जणांचे जामीन अर्ज शुक्रवारी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळले.
ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या १२ आणि पोलिसांच्या ‘रडार’वर असलेल्या (पाहिजे) ३६ अशा एकूण ४८ जणांचे जामीन अर्ज शुक्रवारी कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी लवकरच अटकसत्र सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पेट्रोलपंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सरकार्ड, मदरबोर्ड आदीमध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे गुन्हे शाखेने राज्यभरात छापे टाकले. दरम्यान, महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत, तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्तान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १८८ पेट्रोलपंपांवर कारवाई करून ३३ जणांना अटक केलीे. यात पेट्रोल पंपमालक/चालक ६, मॅनेजर ८, तंत्रज्ञ ९ आणि अधिकृत ९, माजी सॉफ्टवेअर इंजिनीअर-१ यांचा समावेश आहे. अजूनही ४० जण पोलिसांच्या ‘रडार’वर असून विनय पाटील व इतर ३५ जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तर, अटक ३३ जणांपैकी विपुल देढिया यांच्यासह इतर ११ जणांनी जामीन मिळावा, म्हणून कल्याण अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता.