मेट्रोच्या आरएमसी प्लान्टआडून ठामपा अधिकाऱ्यांनी केली ४८ कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:49 PM2019-12-19T23:49:22+5:302019-12-19T23:49:40+5:30
शिवसेना नगरसेविकेचा गंभीर आरोप : पालिका प्रशासन मात्र निरुत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वडाळा ते कासारवडवली मेट्रो कामाच्या वृक्षतोडीवरून सध्या वातावरण तापले असतानाच कारशेड उभारण्यासाठी आरएमसी प्लान्टला महापालिकेने जागा दिली आहे. परंतु, तिचे भाडेच पालिका वसूल करीत नसल्याची धक्कादायक बाब गुरुवारी महासभेत उघडकीस आली. विशेष म्हणजे नियमानुसार भाडे वसूल केले जात नसले, तरी नियमाबाहेर जाऊन मागील वर्षभरापासून काही अधिकाऱ्यांनी तब्बल ४८ कोटींची वसुली केल्याचा धक्कादायक आरोप भाजपच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला. या गंभीर आरोपावर प्रशासन मात्र निरुत्तर झाल्याचे सभागृहात दिसले.
गुरुवारी महासभेत प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने मणेरा यांनी आरएमसी प्लान्टसाठी जागा दिली आहे का, त्याचे भाडे वसूल केले जाते का, केव्हापासून जागा दिली आहे, असे अनेक प्रश्न केले. परंतु, त्यांची उत्तरे प्रशासनाला देता आली नाहीत. केवळ एमएमआरडीएकडून आलेल्या पत्रांचा दाखला देऊन नाममात्र दराने भाडे वसूल करण्यात यावे, असे अधिकाºयांनी सांगितले. मात्र, अशा पद्धतीने हा प्लान्ट उभारण्यासाठी पालिकास्तरावर जरी मंजुरी दिली असली, तरी त्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत आणणे गरजेचे होते, असे मत राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी व्यक्त केले. परंतु, पालिकेने तशी कोणतीच तजवीज केली नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
पुढील महासभेत पुरावे सादर करणार : पालिकेने दिलेल्या उत्तरात संबंधित जागा आरएमसी प्लान्टसाठी दिली असली तरी तिचे भाडे वसूल केले जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. या जागेचे महिन्याकाठी चार कोटींचे भाडे अपेक्षित धरले, तरी वर्षाचे पालिकेचे ४८ कोटींचे नुकसान झाले असल्याची बाब मणेरा यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे भाडे वसूल होणे गरजेचे होते, असेही त्यांनी सांगितले. नियमानुसार भाडे वसूल होत नसले तरी नियमाबाहेर जाऊन काही अधिकाºयांनी ते वसूल केल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला असता त्याचे उत्तर प्रशासनाकडे नव्हते. यानंतर आक्रमक होत त्यांनी या सर्वांची माहिती पुढील महासभेत मीच प्रशासनाला देईल, असे खुले आव्हानही दिले. त्यामुळे आता महापालिकेत आणखी एक भ्रष्टाचार उघड होतो की काय, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे.