परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

By अजित मांडके | Published: April 1, 2024 04:11 PM2024-04-01T16:11:07+5:302024-04-01T16:11:15+5:30

तीन वर्षासाठी घेतले जाणार वाहक, ३८ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा केला जाणार खर्च

486 contract carriers of transport now only after the Lok Sabha elections | परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

परिवहनच्या ४८६ कंत्राटी वाहकांना आता लोकसभा निवडणुकीनंतरचाच मुहुर्त

ठाणे : ठाणे परिवहनच्या सेवेत टप्याटप्याने इलेक्ट्रिक बसचा समावेश होत आहे. तसेच येत्या काळात आणखी नव्याने बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. परंतु परिवहनच्या ताफ्यात वाहकांची कमतरता असल्याने १०० बस धुळखात पडून असल्याची माहिती समोर आली होती. अखेर ठाणे परिवहन सेवेमार्फत पुढील तीन वर्षासाठी तब्बल ४८६ वाहक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर झाला असून त्यापोटी ३७ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. परंतु आता ही भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतरच पार पडणार असल्याने ठेकेदार अंतिम होऊनही जून महिन्यातच ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली.

परिवहनच्या ताफ्यात सध्यस्थितीला ३५० च्या आसपास बस आहेत. त्यात इलेक्ट्रिक ११३ च्या आसपास बस दाखल झाल्या आहेत. त्यातील ९९ बस रस्त्यावर धावत आहेत. तर उर्वरीत सात बस या वाहक नसल्याने आगारात पडून आहेत. परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ठेकेदाराच्या २४०, परिवहनच्या स्वत:च्या १५० च्या आसपास, व्होल्वो ३०, इलेक्ट्रिक ११३ बस आहेत. परिवहनमधून रोज दोन ते अडीच लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. दुसरीकडे परिवहनच्या ताफ्यात असलेल्या बसपैकी यापूर्वी १५३ बस या जुन्या झाल्याने भंगारात काढण्यात आल्या आहेत. तसेच दोन महिन्यापूर्वी आणखी १७ बस भंगारात काढण्यात आल्या आहेत. परंतु आता परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या वाढत आहे. येत्या काळात परिवहनच्या ताफ्यात पीएम ई बस योजनेतून पालिकेला शंभर विद्युत बस उपलब्ध होणार आहेत.

परिवहन उपक्रमामध्ये ९५२ वाहक कार्यरत आहेत. त्यामध्ये ६२१ कायमस्वरुपी वाहक आहेत. उर्वरीत कंत्राटी वाहक आहेत. त्यात २०६ पुरुष आणि १२५ महिलांचा समावेश आहे. ठाणे परिवहन कार्यालयातील इतर विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा कामाचा भार काही कायमस्वरुपी वाहकांवर सोपविण्यात आला आहे. ६२१ पैकी १८० वाहकांना कार्यालयीन कामांचा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण होऊन बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. दुसरीकडे वाहकांची कमतरता असल्याने आजही नव्याने दाखल झालेल्या सुमारे १०० बस धुळ खात पडून असल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान आता परिवहनच्या ताफ्यात ४८६ कंत्राटी स्वरुपात वाहक घेण्यासंदर्भात निविदाकार अंतिम करण्याचा प्रस्ताव मंजुर झाल्याची माहिती परिवहन सुत्रांनी दिली. त्यानुसार तीन वर्षासाठी हे कर्मचारी घेतले जाणार असून त्यापोटी ३७ कोटी ८९ लाख २८ हजार ३६८ रुपयांचा खर्च होणार आहे. त्यातही वाहक भरतीसाठी केवळ एकच ठेकेदार आल्याने अखेर पालिकेने तो अंतिम केला आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने जूनमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच भरतीची ही प्रक्रिया मार्गी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: 486 contract carriers of transport now only after the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे