‘बिसमिल्ला’ कॉलेजचा ४९ विद्यार्थ्यांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:18 AM2017-12-26T03:18:53+5:302017-12-26T03:19:43+5:30
टिटवाळा : कल्याण तालुक्यात खडवली येथे नव्याने सुरू झालेल्या ‘बिसमिल्ला भट्ट कॉलेज आॅफ फार्मसी’ने ४९ विद्यार्थ्यांच्या फीच्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे.
टिटवाळा : कल्याण तालुक्यात खडवली येथे नव्याने सुरू झालेल्या ‘बिसमिल्ला भट्ट कॉलेज आॅफ फार्मसी’ने ४९ विद्यार्थ्यांच्या फीच्या लाखो रुपयांचा अपहार केला आहे. फसवणूक झालेले विद्यार्थी, पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.
या कॉलेजने जुलै २०१७ मध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या. त्यात ‘फार्मासिटीकल कौन्सिल आॅफ इंडिया’ची मान्यता असल्याचा दावा केला होता. त्यानुसार, ४९ विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या डी-फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. वार्षिक फी म्हणून एक लाख ६० हजार आकारले गेले. काही जणांकडून एक लाख १० हजार, एक लाख २० हजार, ५० हजार घेऊन कॉलेज सुरू झाले. चार महिने कारभार व्यवस्थित चालवण्यात आला. १५ शिक्षक व इतर कर्मचारी होते. परंतु, चार ते पाच दिवसांपासून कॉलेज बंद आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थी व पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारामुळे ४९ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया जाणार आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागणार आहेत.
>संस्थाचालक अज्जीमुद्दीन बिसमिल्ला शेख (२२), महंमद इजाजउद्दीन जमालउद्दीन रहेमानी (२८) महंमद कलीम महंमद याकूब शेख (२८, रा. सर्व वडाळा व अॅन्टॉप हिल, मुंबई) यांच्याविरुद्ध पालक अकील मोहमद्दी सिद्दीकी पटेल यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.