ठामपाच्या अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:55+5:302021-03-10T04:39:55+5:30

ठाणे : कोरोनामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प ...

491 crore increase in Thampa's budget | ठामपाच्या अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ

ठामपाच्या अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ

Next

ठाणे : कोरोनामुळे कोणत्याही नव्या प्रकल्पांची घोषणा न करता काटकसरीचा दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला होता; परंतु यात स्थायी समितीने तब्बल ४९१ कोटींची वाढ सुचविली आहे. त्यामुळे तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता, पाणीपट्टी, जाहिरात, पार्किंग, शहर विकास विभाग, स्थावर मालमत्ता, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांचे टार्गेट वाढविले असून, ४९१ कोटींची वाढ केली असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांनी दिली. आता तो महासभेच्या मंजुरीसाठी पाठविला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ५ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला २०२०-२१ चे दोन हजार ८०७ कोटींचे सुधारित, तर २०२१-२२ चे दोन हजार ७५५ कोटी ३२ लाखांचा मूळ अर्थसंकल्प सादर केला. त्यावर स्थायी समितीने १५ दिवस चर्चा केल्यानंतर मंगळवारी मंजुरी दिली. सर्व विभागांशी चर्चा केल्यानंतर २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात ११० कोटी ९३ लाखांची वाढ केल्याने सुधारित अर्थसंकल्प दोन हजार ९१७ कोटी ९६ लाखांवर गेला असून, मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केली असल्याने तो तीन हजार २४६ कोटी ३२ लाखांवर गेला आहे.

कोरोनामुळे पालिकेचे उत्पन्न कमालीचे घटले असल्याने मूळ अर्थसंकल्पात प्रशासनाने एक हजार ३०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे जे प्रकल्प सुरू आहेत त्यांनादेखील ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली होती. याशिवाय नगरसेवकांना प्रभागात कामे करणे कठीण झाले होते. यासाठी मूळ अर्थसंकल्पात ४९१ कोटींची वाढ केल्याची माहिती सभापतींनी दिली. उत्पन्न वाढीसाठी मालमत्ताकरामध्ये १०० कोटी, जाहिरात फीमध्ये १७ कोटी ६३ लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग १० कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यापोटी १९ कोटी, शहरविकास ३१३ कोटी, पाणीपुरवठा विभाग २५ कोटी इतर विभागांकडून सहा कोटी ३७ लाख, अशी ४९१ कोटींची वाढ केली आहे.

Web Title: 491 crore increase in Thampa's budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.