४९४ कर्मचा-यांना किमान वेतन, २७ गावांतील कर्मचा-यांनी केला जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:58 AM2017-10-07T00:58:22+5:302017-10-07T01:01:09+5:30
केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे
कल्याण : केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचा-यांना त्याचा लाभ होणार आहे. किमान वेतनाचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती मिळताच या कर्मचा-यांनी महापालिका मुख्यालयाच्या आवारात एकच जल्लोष करत आयुक्त पी. वेलरासू यांचे आभार मानले. या वेळी ‘आयुक्त झिंदाबाद’च्या घोषणाही देण्यात आल्या.
१ जून २०१५ ला २७ गावे केडीएमसीत पुन्हा समाविष्ट झाली. तेथील कर्मचा-यांनाही प्रथमत: सहा महिन्यांसाठी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर, वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. परंतु, कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत होती. यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनीही नुकतीच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा आयुक्तांनी २७ गावांतील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना सरकारी निर्णयानुसार लागू असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी होणाºया महासभेत प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला. ४९४ कर्मचाºयांपैकी चार जण हे अधिनियमात नमूद केलेल्या किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले आहेत. तर, एका कर्मचा-याचे निधन झाले आहे.
कर्मचा-यांची प्रभागनिहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभाग क्षेत्रात २२७, तर ‘ई’ प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५९ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२३ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु, गावांची संख्या २७ आहे. भोपर व देसलेपाडा या गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे, त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे. दरम्यान, महापालिकेच्या तिजोरीवर महिन्याला ७६ लाख १८ हजार २०, तर वर्षाला ९ कोटी १४ लाख १६ हजार २४० रुपयांचा बोजा पडणार आहे.