मानसिक छळ प्रकरणी १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:24 AM2019-11-17T03:24:42+5:302019-11-17T03:24:57+5:30
प्रशिक्षणार्थीने केली तक्रार, दोनच दिवसांपूर्वी घेतला होता प्रवेश
- हितेन नाईक
पालघर : पालघरमधील डॉ. ढवळे मेमोरियल रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा रूग्णालयाच्या १५ वरिष्ठ डॉक्टरांनी मानसिक छळ केल्याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सर्व आरोपी डॉक्टर अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
नाशिकची रहिवासी असलेल्या प्रियंका शुक्लानेएमडी होमियोपॅथी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. ती डॉक्टर ढवळे रूग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दोन दिवसापूर्वी रु जू झाली होती.येथे प्रशिक्षण घेत असताना रुग्णालयात १४ नोव्हेंबर रोजी बैठक झाली. यातील काही वरिष्ठांसोबत आपली ओळख करून घेत असताना त्यातील काही डॉक्टरांनी गुरूवारी रात्री तिचा मानसिक छळ केला. यामुळे या विरोधात तिने या सर्व वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात तक्र ार दाखल करण्याचे ठरवले.
तिने शुक्रवारी तिच्यासोबत घडलेला प्रकार पालघर पोलीस ठाण्यात सांगितला. मात्र,या डॉक्टरांनी तक्रार करू नये म्हणून तिच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केल्याचे कळते. मात्र तिच्या नातेवाईकांनी तिला दिलेल्या पाठिंब्यामुळे व असला घृणास्पद प्रकार इतर डॉक्टरसोबत घडू नये म्हणून महिला डॉक्टरांच्या फिर्यादीवरून पालघर पोलिसांनी १५ डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुजीत ठाकूर हे पुढील तपास करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन डॉक्टरांचे जबाब नोंदवले असल्याचे ‘लोकमत’ ला सांगितले.
शुक्ला यांनी संस्थेकडे भूमिका मांडली नसल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे
डॉ. प्रियंका शुक्ला या विद्यार्थीनीने आपले रॅगिंग झाल्याबाबत पोलिसात तक्र ार दाखल करण्यापूर्वी महाविद्यालयातील कुठल्याही अधिकाऱ्यांकडे आपली भूमिका मांडली नसल्याचा खुलासा ढवळे रूग्णालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आनंद कापसे यांनी केला आहे.
नवीन बॅचच्या स्वागतासाठी रविवारी फ्रेशर्स पार्टी होणार असल्याने १४ नोव्हेंबर रोजी एक बैठक झाली. यात आपल्याला मानसिक त्रास देण्यात आला अशी डॉ. शुक्ला यांनी पालघर पोलिसात तक्रार दाखल करण्यापूर्वी कुठल्याही अधिकाºयांकडे आपली भूमिका मांडली नाही.अथवा त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्राचार्य व अँटी रॅगिंग सेनेच्या अध्यक्ष यांच्याशी बोलण्यास त्यांनी नकार दिल्याचे प्रभारी प्राचार्यांनी म्हटले आहे.
या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांशी संस्थेने संपर्क साधला असता या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचे रॅगिंग झाले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अश्लील संभाषण, कृती झाली नाही असे सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. ही बैठक हसत-खेळत झाल्याचेही ते म्हणाले. ढवळे संस्था विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी काळजी घेत असल्याचेही डॉ. कापसे यांनी स्पष्ट केले.