भिवंडी येथून ५ मुलींची शरीर विक्रयाच्या व्यवसायातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 06:14 PM2017-12-21T18:14:11+5:302017-12-21T18:17:43+5:30
बांग्लादेशातून घुसखोरी केलेल्या मुलींना शरीर विक्रयास लावणार्या तीन आरोपींना ठाण्याच्या अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरूवारी रात्री भिवंडीतून अटक केली. येथून पाच मुलींची सुटका पोलिसांनी केली.
ठाणे : भिवंडी येथील शरीर विक्रयाच्या अड्ड्यावर ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री धाड टाकून पाच मुलींची सुटका केली. त्यापैकी दोन मुली बांग्लादेशी घुसखोर आहेत.
भिवंडी येथील खदान रोडवरील हनुमान टेकडी येथे शहनवाज बर्डी याच्या घरात काही मुलींना शरीर विक्रयासाठी आणल्याची माहिती ठाण्याच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. माहितीची शहानिशा करून या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर आणि त्यांच्या सहकाºयांनी बुधवारी रात्री शहनवाजच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरामध्ये पाच मुली आढळल्या. पोलिसांनी या मुलींची सुटका करून आशा उर्फ जयंती नामक दलाल आणि मॅनेजर लक्ष्मी यांना अटक केली.
घरात शरीर विक्रयाचा धंदा सुरू असताना पोलिसांच्या धाडीकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि वेळप्रसंगी मुलींना पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम नामदेव जाधव नामक आरोपीवर सोपविण्यात आले होते. पोलिसांनी त्यालाही अटक केली. भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली असून, त्यापैकी दोन मुली बांग्लादेशी आहेत. अवैध मार्गाने त्यांनी भारतात घुसखोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय तीन मुली कोलकाता येथील आहेत. तीनही आरोपींना गुरूवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.