महिला ओढताहेत ३५० किलोंची ट्रॉली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:03 AM2020-02-16T02:03:00+5:302020-02-16T02:03:14+5:30
संडे अँकर । मनोरुग्णालयातील प्रकार : आरोग्यमंत्र्यांना घालणार साकडे
ठाणे : ठाणे मनोरुग्णालयातील महिला कर्मचारी आठ महिन्यांपासून रुग्णांना चहा/नाश्ता आणि जेवण तसेच कपडे देण्यासाठीची ट्रॉली ओढत असून यामुळे त्यांना आजाराच्या अनेक समस्यांनी ग्रासल्याची बाब महाराष्टÑ औद्योगिक / औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघाने रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीसुद्धा, प्रशासनाकडे दुर्लक्ष केल्याने कामगार संघ याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालणार आहे. त्यानंतरही काही सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा संघाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून मानसोपचारतज्ज्ञ हे पद रिक्त असून सध्या या रिक्तपदावर स्त्रीरोगतज्ज्ञ या पदावरील डॉक्टरांना पदभार दिला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. या रुग्णालयात महिला मनोरुग्णांसाठी एकूण १२ वॉर्ड असून त्यामध्ये ३४५ महिला मनोरुग्ण आहेत. वेळेवर त्यांना चहा/नाश्ता/दुपारचे व रात्रीचे जेवण तसेच त्यांचे कपडे इत्यादी सर्व सुविधा वेळेवर पुरवाव्या लागतात. हे काम प्रामाणिकपणे महिला परिचर करीत असतात. मात्र, या कामासाठी प्रशासनाने ट्रॉलीची व्यवस्था केली असली, तरी ती ओढण्यासाठी आवश्यक तो मदतनीस दिला नाही. या ट्रॉलीचे वजन १५० किलो असून जेवणाचे वजन जवळपास २०० किलो ते २५० किलो असते. अशावेळी प्रत्येक दिवशी ३५० किलो इतक्या वजनाची ट्रॉली महिला परिचरांना दररोज ढकलून प्रत्येक वॉर्डापर्यंत न्यावी लागते.