शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याच्या अमिषाने पाच लाखांची फसवणूक
By अजित मांडके | Published: May 31, 2024 04:17 PM2024-05-31T16:17:14+5:302024-05-31T16:18:55+5:30
सुदेश भायदे यांना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २५ एप्रिल २०२४ रोजी च्या दरम्यान एका अनोळखी मोबाईलधारक भामटयाने फोन केला.
ठाणे: शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने सुदेश प्रभाकर भायदे (३५, रा. ऐरोली, नवी मुंबई) या व्यावसायिकाची चार लाख ९८ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी दिली.
सुदेश भायदे यांना ८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २५ एप्रिल २०२४ रोजी च्या दरम्यान एका अनोळखी मोबाईलधारक भामटयाने फोन केला. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक परतावा, मिळवून देण्याचे त्याने प्रलोभन दाखविले. त्यानंतर भायदे यांना या भामटयाने त्याचे बँक खात्यावर चार लाख ९८ हजारांची रक्कम ऑनलाईन पाठविण्यास सांगितली. त्या बदल्यात त्यांना कोणताही जादा परतावा किंवा त्यांची मुद्दलची रक्कमही परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या प्रकाराबाबत त्यांनी या भामटयाविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात ३० मे २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जगताप हे करीत आहेत.