भिवंडीमध्ये पाच लाख लिटर प्रतिदिन दूध क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 06:48 PM2017-09-12T18:48:09+5:302017-09-12T18:48:09+5:30
दुग्धविकास विभागाची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सात हेक्टर जागा मदर डेअरी फ्रूट अॅन्ड व्हिजेटेबल या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या सहयोगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आली.
ठाणे, दि 12 - दुग्धविकास विभागाची ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील सात हेक्टर जागा मदर डेअरी फ्रूट अॅन्ड व्हिजेटेबल या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या सहयोगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी प्रतिदिन पाच लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. दुधाचे संकलन व त्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार केले जाणार आहे.
या प्रकल्पाच्या सामंजस्य भाडेपट्टे करारावर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि कंपनीचे सदस्य यांनी स्वाक्षरी केली. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या प्रकल्पाची आढावा बैठक काल समिती कक्ष मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी हा करार करण्यात आला. यावेळी पशू संवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष दिलीप रथ, पशू संवर्धन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भिवंडी तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथील मौजे गोवे येथील सुमारे ७ हेक्टर जागा मदर डेअरीला देण्यात येणार आहे. यासाठी मदर डेअरीकडून नाममात्र १ रुपया दर वर्षाला असे ३० वर्षांसाठी हा भाडेतत्वावरील करार असेल. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रकल्पाची क्षमता ५ लाख लिटर दूध प्रतिदिन इतकी असेल. या ठिकाणाहून दूध आणि दुधाशी संबंधित पदार्थ मदर डेअरीला उत्पादित करता येतील.