Mumbra Hospital Fire: दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ठामपानेही 5 लाखांचे अर्थसाह्य करावे- शानू पठाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:40 PM2021-04-28T12:40:23+5:302021-04-28T12:41:23+5:30
Prime Hospital Fire: फायर ऑडिट संदर्भात शानू पठाण यांनी सांगितले की, फायर ऑडीटबाबत मुंब्रा- कौसामधील रुग्णालयांनी ठामपाकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रुग्णालयांचे व्यवस्थापन मनमानी करीत आहेत.
ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दुर्घटना घडल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ठाणे महानगर पालिकेनेही या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी ठामपाचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे.
शानू पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राईम हॉस्पीटलला आग लागल्यानंतर रुग्णांना बिलाल, कालसेकर आणि बुर्हाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौघांचा मृत्यू झाला आहे. गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मिळवून देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी आहे की, ठाणे महानगर पालिकेनेही मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांचे अर्थसाह्य करावे. ठामपा अधिकारी आणि पोलिसांची संयुक्त समिती या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
फायर ऑडिट संदर्भात शानू पठाण यांनी सांगितले की, फायर ऑडीटबाबत मुंब्रा- कौसामधील रुग्णालयांनी ठामपाकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रुग्णालयांचे व्यवस्थापन मनमानी करीत आहेत. जर, वेळीच या रुग्णालयांना ठामपाकडून साह्य झाले असते तर त्यांनी नक्कीच फायर सिस्टीम कार्यान्वीत केली असती. त्यातून पालिकेचे उत्पन्नही वाढले असते, असेही ते म्हणाले.