पाच टक्के दरवाढीने तिळगुळावर महागाईची संक्रांत, राजस्थानचा गजक बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:37 AM2018-01-09T02:37:22+5:302018-01-09T02:37:30+5:30
संक्रांतीचा गोडवा वाढवणा-या तिळगुळावर यंदा महागाईची संक्रांत आली आहे. तिळगुळाच्या लाडवांच्या दरात पाच टक्के तर हलव्याच्या दागिन्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना चावता येतील, असे नरम लाडू बाजारात उपलब्ध झाल्याने खलबत्त्यात लाडू फोडण्याची कसरत त्यांना यावर्षी करावी लागणार नाही.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : संक्रांतीचा गोडवा वाढवणा-या तिळगुळावर यंदा महागाईची संक्रांत आली आहे. तिळगुळाच्या लाडवांच्या दरात पाच टक्के तर हलव्याच्या दागिन्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना चावता येतील, असे नरम लाडू बाजारात उपलब्ध झाल्याने खलबत्त्यात लाडू फोडण्याची कसरत त्यांना यावर्षी करावी लागणार नाही.
जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तो येत्या रविवारी आहे. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत परस्परांना तिळगुळाचे लाडू व फुटाणे, यांची देवाण घेवाण केली जाते. त्याचबरोबर गुळाची पोळी, तिळाची पोळी, काटेरी हलवा, तिळाचा हलवा, तिळाची चिक्की हे पदार्थ उपहारगृहांत, तसेच दुकानांत विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. यंदा संक्रांतीनिमित्त राजस्थानमध्ये नावाजलेला ‘गजक’ हा तिळापासून बनवलेला पदार्थ उपलब्ध असल्याचे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गजक हा खाद्यपदार्थ अंडाकृती असून तो ४०० रुपये किलो दराने मिळत आहे. यंदा तिळाचे दर स्थिर असले तरी गुळाच्या दरात मात्र चांगलीच वाढ झाल्याने गेल्या वर्षी ३२० रुपये किलो दराने मिळणारा तिळगुळ यंदा ३४० रुपये किलो दराने मिळत आहे.
संक्रांतीचे लाडू खाण्याची इच्छा आहे पण दात काढले आहेत किंवा दातांवर कॅप बसवली आहे त्यामुळे खाता येत नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नागरिक करतात. काही ज्येष्ठ नागरिक कडक लाडू घरी घेऊन जातात व खलबत्त्यात फोडून मग लाडू खातात. यामुळे त्यांची लाडू खाण्याची मजा कमी होते शिवाय बोट खलबत्त्यात सापडून दुखापत होण्याची भीती असते. त्यामुळे ज्येष्ठांसाठी खास नरम लाडू तयार करण्यात आले आहेत. नरम गुळ वापरुन तयार केलेल्या लाडवाचे आणि कडक लाडवाचे दर सारखेच आहेत. गेल्या चार दिवसांपासून तिळगुळ बनवण्यास सुरूवात झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले. गुळपोळी आणि तिळपोळी ६० रुपये दोन नग तर तिळाची पोळी ३४० रुपये किलो दराने मिळत आहे. फुटाण्यांमध्ये काटेरी हलवा, तिळाचा हलवा हे प्रकार असून २०० रुपये किलो दराने ते मिळत आहेत. यंदा हलव्याचे दर वाढलेले नसून ते स्थिर आहेत.
हलव्याच्या दागिन्यांचे दर वाढले : संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांनाही महत्त्व असते. त्यात मुकुट, बासरी, बांगड्या, बाजूबंद, हार बनवले जातात. हलव्याचे दागिने घालून लहान मुले, सुना अथवा जावई यांचा ‘तिळसण’ साजरा करण्याची पद्धत आहे. हे दागिने तयार करणाºयांची मजुरी वाढल्याने ते ३० रुपयांनी वाढले आहेत. गेल्यावर्षी १७० रुपयांपासून दागिन्यांचे दर होते. यंदा दर २०० ते ४०० रुपये आहे. परदेशात तिळगुळ पाठविण्यासाठी खरेदी सुरू झाली आहे. लाडू आणि गुळपोळ््या जास्त खरेदी केल्या जात आहेत. स्थानिक खरेदी ही शेवटच्या दिवसांत होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.