उल्हासनगरात एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या ५ जणांना अटक
By सदानंद नाईक | Updated: September 2, 2023 18:18 IST2023-09-02T18:17:50+5:302023-09-02T18:18:11+5:30
सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्याचे बिंग फुटले असून उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी ५ जणांना अटक केली.

उल्हासनगरात एकाला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या ५ जणांना अटक
उल्हासनगर : सामाजिक कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्याचे बिंग फुटले असून उच्च न्यायालयाच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी ५ जणांना अटक केली. न्यायालयाने आरोपींना पोलीस कस्टडी सुनावली असून तपासात मोठे मासे मिळण्याची शक्यता निर्माण झाली. सनद प्रकरणी वादात सापडलेले प्रांत कार्यालय पुन्हा चर्चेत आले आहे.
उल्हासनगरातील माहिती अधिकार कार्यकर्ता मोती दुसेजा यांना २९ जानेवारी २०२२ साली मध्यवर्ती पोलिसांनी दुकानातून उचलून आणले. पोलीस ठाण्यात अंगझडतीत गावठी कट्टा मिळल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. या खोट्या गुन्ह्याच्या विरोधात दुसेजा यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावून सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज व इतर माहिती उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने या गुन्ह्या प्रकरणी थेट पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांना चौकशीचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशाने पाठारे यांनी तपास करून सुरवातीला आसिफ उर्फ बाबू मेहबूब खान याला ताब्यात घेऊन बोलते केले. त्यानंतर अजित भाटिया, सलमान शेख, अशोक बजाज व अमन किय्याउद्दीन खान यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली असून स्वतः पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे याप्रकरणी तपास करीत आहेत.
शहरातील शासकीय, आरक्षित व खुले भूखंड वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता दुसेजा यांनी माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन भूमाफिया, दलाल, अधिकारी यांचे बिंग फोडत होते. त्यामुळे मोती दुसेजा याचा अडसर दूर करण्यासाठी मध्यवर्ती पोलीसानी अटक आरोपी सोबत संगनमत केले. त्यांनी गावठी कट्टा सापडल्याचा बनाव करून दुसेजा यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले. प्रांत कार्यालयाकडून आरक्षित भूखंड, खुले भूखंड, खाजगी मालकीचे भूखंड, कॅम्प नं-५ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची खुली जागेसह इतर शासकीय कार्यालयाच्या जागेवर सनद दिल्याचा प्रकार यापूर्वीच उघड झाला आहे. प्रांत कार्यालयाने दिलेल्या सनदची चौकशी होऊन, काही सनद रद्द केल्या आहेत. दिलेल्या सनदची चौकशी झाल्यास मोठे मासे फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भूमाफियां व दलालचे धाबे दणाणले
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे हे स्वतः खोट्या गुन्ह्या प्रकरणी तपास करीत आहेत. या तपासात भूमाफियां, दलाल, तत्कालीन अधिकारी यांचे धाबे दणाणले आहे. तसेच मध्यवर्ती पोलिसांवरही न्यायालयाने याप्रकरणी ताशेरे ओढले आहे.