डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज
By प्रशांत माने | Published: September 20, 2022 07:07 PM2022-09-20T19:07:40+5:302022-09-20T19:08:23+5:30
डोंबिवलीतील स्फोटात जखमी झालेल्या ५ वर्षीय चिमुकल्या रियांशला डिस्चार्ज मिळाला आहे.
डोंबिवली: येथील पश्चिमेकडील गायकवाडवाडी परिसरातील पारसनाथ इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात २३ ऑगस्टला सिलेंडरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेला रियांश लोढाया हा पाच वर्षीय मुलगा महिनाभरानंतर बरा होऊन घरी परतला.
या स्फोटात रियांश त्याची आई उरसुल्ला (वय ४०) आणि ज्या घरात स्फोट झाला तेथील रहिवाशी मनीषा मोर्वेकर (वय ६५) या जखमी झाल्या होत्या. रियांशची आई उरसुल्ला यांना काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. परंतु मोर्वेकर या ५० टकके भाजल्या होत्या. तर रियांश हा देखील २० टक्के भाजला होता. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान मोर्वेकर यांची २९ ऑगस्टला उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. जखमी अवस्थेतील रियांशवर मात्र उपचार सुरु होते. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया देखील झाली होती. अखेर रियांश उपचारानंतर बरा झाल्याने त्याला सोमवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.