कल्याण डोंबिवलीच्या शाळांमध्ये गुरुजींची ५० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:11+5:302021-06-17T04:27:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य आहे, असे आदेश महापालिकेच्या शिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची उपस्थिती ५० टक्के अनिवार्य आहे, असे आदेश महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना दिले आहेत. त्यानुसार शाळांमध्ये बुधवारपासून ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती सुरू झाली आहे.
शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०० टक्के, तर मुख्याध्यापकांनाही १०० टक्के उपस्थिती बंधनकारक आहे. शाळेच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती सक्तीची केली आहे. वर्क फ्रॉम होम करीत असलेल्या शिक्षकांनी वर्षभरात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले आहे. ज्या पालकांची ऐपत नाही, ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा नाही, त्या पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही शिक्षकांनी समन्वय साधून ऑफलाईन शिक्षणासाठीही काम केले आहे. आता ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही शिक्षणाची तयारी करण्यासाठी ५० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे.
मंगळवारी पहिल्या दिवशी १०० टक्के उपस्थिती होती. प्रदीर्घ सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस गैरहजेरीचा नसावा, यामुळे काल १०० टक्के उपस्थिती लावली गेली. बुधवारपासून ५० टक्के शिक्षक शाळांमध्ये उपस्थित आहेत. काही शाळांमध्ये दहावीच्या निकालाचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा झालीच नसल्याने त्यांना प्रमोट करण्यासाठी शिक्षक शाळेत येऊन काम करीत आहेत. शाळेत पूर्ण वेळ बसवून ठेवण्यापेक्षा काम झाले की अवघ्या दोनच तासात शिक्षकांना घरी सोडण्यात येत आहे. कोरोना नियमांचे पालन करून ही उपस्थिती शिक्षकांकडून लावली जात आहे.
----------------
१. शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. हजेरी पुस्तकावर शिक्षकांना सह्या कराव्या लागत आहेत. शाळेचे वरिष्ठ अधिकारी अचानक भेट देऊन पाहणी करीत आहेत. याशिवाय माझा विद्यार्थी माझी जबाबदारी ही संकल्पना केडीएमसीकडून राबविली जाणार आहे. त्याची तयारी विविध शाळांमधून केली जाणार आहे.
- विलास निखर, शिक्षक
२. शिक्षकांकडून ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यावेळी वर्क फ्रॉम होम सुरू होते. आता दहावीच्या निकालाची कामे सुरू आहेत. त्यामुळे बुधवारपासून शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती लावावी लागत आहे. त्याचबरोबर चालू वर्षातील ऑनलाईन शिक्षणाची तयारीही सुरू आहे.
- अमोल पाटील, शिक्षक
--------------------
कल्याण डोंबिवली महापालिकेतील शाळांमध्ये कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू होते. मंगळवारी पहिल्याच दिवशी शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती होती. बुधवारपासून ५० टक्के उपस्थिती आहे. ऑनलाईन शिक्षणाची तयारी तसेच नव्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पालकांशी समन्वय साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती लावायची आहे.
- जे. जे. तडवी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, केडीएमसी
---------------------------
खासगी आणि सरकारी एकूण प्राथमिक शाळा - ३१८
एकूण विद्यार्थी - ११७९२५
एकूण शिक्षक - ३३३२
---------------------------
शाळा आणि उपस्थिती...
१. गजानन विद्यालय- ५० टक्के
२. मोठा गाव ठाकुर्ली- ५० टक्के
३. उंबर्डे- ५० टक्के
४. बारावे- ५० टक्के
५. के. सी. गांधी- ५० टक्के
६. नूतन विद्यालय- ५० टक्के
---------------------------