ग्रामीण भागात कोविड केअर सेंटरमध्ये ५० टक्के बेड शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:06+5:302021-04-15T04:39:06+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरी भागात खासगी रुग्णालयांसह ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरी भागात खासगी रुग्णालयांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. तर, ग्रामीण परिक्षेत्रात ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ५० टक्के बेड शिल्लक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. तसेच, प्रत्येक ठिकाणी रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनचे प्रत्येक ठिकाणी १० याप्रमाणे चार ठिकाणी ४० बेड उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात तीन ते चार महिने आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. पूर्वी दिवसाला २०० ते ३०० च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता थेट दीड हजार ते दोन हजारांच्या घरात पोहोचली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारलेले कोविड केअर सेंटरसह खासगी कोविड रुग्णालयेही हाउसफुल होऊ लागली आहेत. त्यामुळे रुग्णांना बेडसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात समाधानकारक स्थिती असल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंगे यांनी शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि कल्याण या चार तालुक्यांत ४८३ बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. यामध्ये सध्याच्या घडीला २३८ बेड शिल्लक आहेत़ २४५ बेडवर रुग्ण दाखल असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत असून प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये १० याप्रमाणे ४० ऑक्सिजन बेड आरक्षित ठेवले आहेत. याठिकाणी आलेल्या रुग्णाला प्राथमिक स्तरावर ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास त्या रुग्णाला तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन लावून पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयात स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, सध्या ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून ग्रामीण भागात ५० टक्के बेड कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध असल्याचे दिसत आहे.
तक्ता
ग्रामीण भागातील स्थिती
काेविड सेंटर - बेडची संख्या - रुग्ण असलेले बेड - शिल्लक बेड
भिनार - २०८ - १२८ - ८०
घोटेघर - १०० - ६९ - ३१
वरप - १०० - २८ - ७२
ट्राॅमा केअर सेंटर - ७५ - २० - ५५