अलगीकरण केंद्रातच कोरोनाचे ५० रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:36 AM2020-04-27T02:36:19+5:302020-04-27T02:36:29+5:30
अलगीकरण केंद्राच्या इमारतीतच तब्बल ५० कोरोना रुग्णांना महापालिकेने दाखल केल्याने आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी संताप व्यक्त केला आहे.
भाईंदर : भाईंदरच्या न्यू गोल्डन नेस्ट भागातील पालिकेने सुरु केलेल्या अलगीकरण केंद्राच्या इमारतीतच तब्बल ५० कोरोना रुग्णांना महापालिकेने दाखल केल्याने आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन यांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोना रुग्णांना पालिकेने अन्य रुग्णालय ताब्यात घेऊन किंवा स्वतंत्र इमारतीत उपचारासाठी ठेवणे आवश्यक होते असेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्ण आणून ठेवल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडेही नसल्याचे समजते.
मीरा भार्इंदर महापालिकेने पं. भीमसेन जोशी रुग्णालय हे कोरोना रुग्णालय म्हणून राखीव ठेवले असून त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परंतु पालिकेने जोशी रुग्णालयातील दाखल ५० कोरोना रुग्णांना शनिवारी न्यू गोल्डन नेस्ट जवळील अलगीकरण केंद्राच्या इमारतीत १६, १७ व १८ व्या मजल्यावर हलवले. त्या ठिकाणी पालिकेने कोरोना रुग्णांना ठेऊन उपचार सुरु केले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी पालिकाचा हा मुजोरी कारभार खपवून घेणार नाही असा संताप व्यक्त केला. या इमारतीत आधीच कोरोनाची लागण नसलेल्या २०० पेक्षा जास्त नागरिकांना अलगीकरणासाठी ठेवले आहे. त्याच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताच भर वसाहतीत आणून प्रशासन ठेवत असेल तर हे चुकीचे आहे. ठाणे पालिकेप्रमाणे अन्य खाजगी रुग्णालय वा स्वतंत्र इमारत ताब्यात घेऊन तिकडे कोरोना रुग्णांना ठेवा. या प्रकरणी आपण कोकण विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांशी बोललो आहोत असे सरनाईक म्हणाले. सरनाईकांनी ही माहिती आमदार गीता जैन यांना दिल्यावर त्यांनाही धक्का बसला. पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या ठिकाणी अलगीकरण केंद्रच राहिल, कोरोना रुग्णांना ठेवले जाणार नाही असे आश्वासन त्यांच्यासह स्थानिक शिवसेना नगरसेवकांना दिले होते. परंतु आपण नागरिकांची समजूत काढून ही इमारत अलगीकरण केंद्रासाठी दिली व ते सुरु झाल्याने दिलासा मिळाला. पण असा नागरिकांचा विश्वासघात पालिका करणार असेल तर नागरिक सहकार्य करणार नाही असे जैन यांनी स्पष्ट केले. नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी प्रशासनाचा पोरखेळ सुरु असून या बाबत महापौरांसह कुणालाच विश्वासात घेतलेले नाही. महापौरांनी बैठक बोलावली आहे. तर कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण अलगीकरण केंद्रात हलवल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रमुखांनाही नसल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.
>रुग्णांच्या वर्गवारीनुसार केले दाखल
उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, डॉ. बालनाथ चकोर यांनी जोशी रुग्णालयातून अलगीकरण केंद्रात कोरोनाचे ५० रुग्ण दाखल केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. परंतु त्यांच्यासह पालिका प्रशासनाकडून सायंकाळपर्यंत कोणतीही माहिती वा प्रतिक्रिया देण्यात आली नाही. तर, रुग्णांच्या स्थितीप्रमाणे वर्गवारी करुन त्यांना स्वतंत्र ठेवा, असे निर्देश असल्याने ५० रुग्णांना अलगीकरण इमारतीत दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.