दलित वस्ती विकासासाठी ५० कोटी
By admin | Published: July 9, 2015 11:32 PM2015-07-09T23:32:58+5:302015-07-09T23:32:58+5:30
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रातील दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी सुमारे ४६७ कोटी ७५ लाख ७८ हजारांच्या अनुदानवाटपास नगरविकास खात्याने मान्यता दिली आहे.
नारायण जाधव ठाणे
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या क्षेत्रातील दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी सुमारे ४६७ कोटी ७५ लाख ७८ हजारांच्या अनुदानवाटपास नगरविकास खात्याने मान्यता दिली आहे. पालघरच्या वाट्याला आलेल्या १५ कोटींपैकी वसई-विरार या त्या जिल्ह्यातील एकमेव महापालिकेस साडेसात कोटी आणि उर्वरित साडेसात कोटी पालघर, जव्हार, डहाणू या नगरपालिकांना विभागून मिळणार आहेत. यात, मुंबई शहर १२ कोटी ६७ लाख १७ हजार, मुंबई उपनगरे ५५ कोटी ८० लाख दोन हजार, ठाणे जिल्हा ३५ कोटी आणि पालघर जिल्ह्यास दिलेल्या १५ कोटी अनुदानाचा समावेश आहे. या निधीतून त्या-त्या जिल्ह्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील दलित वस्त्यांत २०१५-१६ या आर्थिक वर्षात विकासकामे करावयाची आहेत.
ठाणे जिल्ह्यास मिळालेल्या ३५ कोटींच्या निधीतून १७ कोटी ५० लाख रुपये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या महापालिकांना देण्यात येणार आहेत, तर १७ कोटी ५० लाख अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिकांना मिळणार आहेत.
याशिवाय, रायगड जिल्ह्यास एक कोटी, रत्नागिरी- दोन कोटी, सिंधुदुर्ग- तीन कोटी ५० लाख २१ हजार रुपये अनुदान मिळाले आहे. अशाच प्रकारे राज्यातील उर्वरित २९ जिल्ह्यांतील दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.